पाथर्डी व शेवगाव शहराच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेस सुधारीत मान्यता - आ. राजळे




पाथर्डी व शेवगाव शहराला सध्या पाणी पुरवठा करणारी पाथर्डी शेवगाव व ५४ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अत्यंत जुनी झाल्याने शेवगाव व पाथर्डी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आमदार मोनिका राजळे ह्या २०१८ पासून या दोन्ही शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजुर होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होत्या. त्या प्रयत्नाला यश येवून ८ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमीत झाला होता. त्यावेळी पाथर्डी शहर पाणी पुरवठा योजना प्रकल्पासाठी रु ७३ कोटी ४७ लाख व शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनासाठी रु. ६७ कोटी २७ लाख योजनेस मंजुरी मिळाली होती. 

त्यानुसार पाथर्डी नगरपरिषदेने निविदा ही प्रसिध्द केली होती. व शेवगांव नगरपरिषदेची निविदा प्रक्रिया सुरु होती. परंतू त्याच दरम्यान DSR (जिल्हा दर सुची) व SSR (राज्य दर सुची) चे दर वाढले होते. तसेच GST दर सुध्दा बदलले. त्यामुळे या योजनेची निविदा प्रक्रिया थांबवावी लागली होती. परंतू नवीन दर सूची व GST मुळे वाढीव किंमती सह पुन्हा नवीन अंदाज पत्रक तयार करणे आवश्यक होते. त्यानुसार पुन्हा राज्य शासनाकडे नवीन दर सूची नुसार अंदाज पत्रकास मान्यता व शासनाचे सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले. ही प्रक्रिया मोठी असल्याने यामध्ये बराच कालावधी गेला. दरम्यान जून मध्ये राज्य शासन बदलले आमदार मोनिका राजळे यांनी पुन्हा पाठपुरावा सुरु केला. यासाठी त्यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेवून पाठपुरावा केला. व आज दि. २०/१०/२०२२ रोजी नवीन अंदापत्रकासह शासनाची सुधारीत शासकीय मान्यता मिळाली. 

शासन निर्णय क्र. नगरो-२०२२ / प्र.क्र. २७० / नवि ३३ दि. २० ऑक्टोबर २०२२ नुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाथर्डी शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास रु. ९५.८५ कोटी च्या पाणी योजनेस तसेच शासन निर्णय क्र. नगरो-२०२२ / प्र.क्र. २७१ / न वि ३३ दि. २० ऑक्टोबर २०२२ नुसार शेवगांव शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास रु. ८२.९८ कोटी च्या पाणी योजनेस आज सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आता या योजनेच्या निविदा प्रक्रिया तात्काळ करुन प्रत्यक्ष कामास सुरुवात करणे सोयीचे झाले आहे.


Post a Comment

0 Comments