पाथर्डी - गोपीनाथ मुंडे यांचे मतासाठी नाव पाहिजे, पण त्यांचे मोठेपण चालत
नाही. तालुक्याच्या प्रगतीमध्ये मुंडे
यांचे नाव वगळलेले जाऊ शकत नाही. कार्यकर्त्यांची गळचेपी होत असेल तर तालुका पेटून
उठेल. इथे पार्थ म्हणजे अर्जुन रडला. इतरांची काय कथा. येत्या आठ दिवसात
पालिकेच्या नव्या इमारतीला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव न दिल्यास आमच्या
पद्धतीने आम्ही नामकरण करू. आमचा अंत पाहू नका. नाव देण्यास विरोध करणाऱ्यांचा
राजकीय अंत करू. अशा शब्दात मुंडे समर्थकांनी इशारा देत धरणे आंदोलन केले.
आंदोलनाचे नेतृत्व नागनाथ गर्जे व सुनील पाखरे यांनी केले. यावेळी माजी
नगराध्यक्ष ऍड. दिनकर पालवे, आपचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष केकान, राम लाड,
सुरेश हुलजुते, अविनाश टकले, तुळशीराम सानप, बाबा साहेब खेडकर, कृष्णा पांचाळ, युसुफ शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित
होते.
पालिकेच्या नव्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून या इमारतीला लोकनेते गोपीनाथ
मुंडे यांचे नाव देण्यावरून भाजपमधील काही कार्यकर्ते पालिका प्रशासनाकडे
पाठपुरावा करीत आहेत. रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय पोलिसांच्या विनंतीनुसार बदलून
सुमारे तासभर राष्ट्रीय महामार्गावरील नाईक चौकात धरणे आंदोलन केले.
यावेळी बोलताना नागनाथ गरजे म्हणाले, मुंडे समर्थकांमुळे तुम्हाला तीन वेळा गुलाल मिळाला.
तुमच्याकडून नाव देण्याबाबत प्रस्ताव अपेक्षित असताना मागणी करणाऱ्या
कार्यकर्त्यांना आडवा दांडू घालण्याचे काम करू नका. स्वार्थ साधला ही कार्यकर्त्या
संपवायचा. या नादात पक्षाची वाट लागली. त्यांच्या नावाशिवाय इमारतीचे उद्घाटन सर्व
शक्तीनिशी हाणून पाडू. तालुक्यात टक्केवारी नावाचा वेगळाच पक्ष तयार होऊन पक्षाचे
जुने कार्यकर्ते पक्ष सांभाळत देशोधडीला लागले. निवडणुकीपुरते मुंडे, इतर वेळी त्यांचे नाव घेतले की नेत्यांना राग येतो. तालुक्यात भाजपचा
शिरकाव सत्तेच्या रूपाने केवळ मुंडे यांच्यामुळे झाला आहे.
यावेळी बोलताना सुनील पाखरे म्हणाले, मुंडे यांचा पूर्ण कृती पुतळा जॉगिंग पार्क नावाच्या
गावाच्या गटारीवर बसू देणार नाही. तालुक्याच्या जनतेला सोप्यात घेण्याची चूक कुणी
करू नये. मुंडे यांचा पुतळा दर्शनी भागात गावात कोठेही बसवा. त्यांचा अपमान सहन
करणार नाही. आम्ही सुरुवातीपासून या मुद्द्यावरून विरोध करीत आहोत. यापुढेही करू.
पालिकेच्या माध्यमातून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांचे दिवस आता भरले आहेत. पालिका
निवडणुकीदरम्यान पोलखोल करू. पक्षाला बदनाम करत वेठीस धरणाऱ्या प्रवृत्ती ठेचून
काढू. येत्या आठ दिवसात निर्णय घ्या. नववा दिवस आमचा राहील. पालिकेपासून
दिल्लीपर्यंत सत्ता आमची असूनही आम्हाला रस्त्यावर यावे लागते. कोण विरोधक,
आणि कोण समर्थक याचा अजून कुणाला मेळ लागत नसल्याने अशा गुडगुडीला
जनता चोख उत्तर देईल.
पालिकेचे उपमुख्य अधिकारी विशाल डहाळे, शहर अभियंता विशाल मडवई यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा करत
भूमिका जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
देण्याबाबत कार्यवाही केली जाईल असे सांगितले.
0 Comments