आम्ही मात्र डीजे वाजवणारच ! - शिवशंकर राजळे

 

पाथर्डी - डी.जे.वाजवायला तुम्ही परवानगी द्या, नका देऊ, आम्ही मात्र डीजे वाजवणारच ! स्पष्ट सांगतो, आम्हाला आजच आत टाकायचे तर टाका. डीजे बाबत गणेश मंडळाचे कार्यकर्ते व मालक यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आवाज मोजण्याचे मशीन आणले. तुम्ही आवाज चेक करा अशा कडक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत प्रशासनाला इशारा दिला.     

पोलीस स्टेशनमध्ये गणेशोत्सव निमित्त शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार मोनिका राजळे, तहसीलदार उद्धव नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले, पालिका अभियंता विशाल मडवई, गटविकास अधिकारी संगीता गर्जे, वीज वितरण कंपनीचे मयूर जाधव, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, आधी प्रमुख उपस्थित होते.

बैठकीमध्ये खंडित वीज पुरवठा, पथदिव्यांचा अभाव, रस्त्यावरील खड्डे, सार्वजनिक शौचालय व मिरवणूक मार्गावरील अडथळे, याबाबत चर्चा झाली  सर्वाधिक चर्चा डीजे वाजवण्याच्या मुद्द्यावरून झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डीजे वाल्यांबरोबरच तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांना प्रभावित करण्यासाठी डीजेला परवानगी मिळावी यासाठी त्यांची पाठ राखण करणाऱ्यांची संख्या सुद्धा लक्ष वेधी होती. प्रशासनावर दबाव वाढवण्याचा प्रयत्नाकडे  मात्र पोलिसांनी फारसे लक्ष दिले नाही. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक पुजारी म्हणाले

डीजे वाजवण्याला परवानगी नाही तर नाहीच. पण कायद्याच्या टप्प्यात आल्यावर कोणालाही सोडणार नाही. कायदा हातात घेऊ नका. पारंपारिक वाद्य वाजवा. डीजेच्या चालकांचे बुकिंग, आगाऊ रकमा, कोणत्या मंडळाने दिले असेल तर आत्ताच विचार  करा. डीजे वाजला की जप्त करणार. भले दहा दिवसात जमले नाही तर अकरावे दिवशी पण जप्तीची कारवाई अटळ राहील. डेसिबल यंत्र पोलीस स्टेशनला उपलब्ध आहे. विनंतीपूर्वक सांगतो डीजे वाजवू नका. डीजे वाजवण्यास बंदी आहे. वाजवल्यास कारवाई सुद्धा अटळ आहे. अशा शब्दात त्यांनी इशारा दिला.     

यावेळी संतोष जिरेसाळ, बंडू बोरुडे, संजय मरकड, सुनील पाखरे, हुमायून आतार,नसीर शेख, मौलाना मन्सूर पठाण, बाबा बोरुडे, आदींनी विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले. गणेशोत्सवापूर्वी पथदिवे चालू करून गावातील सीसीटीव्ही सुरू करण्याबाबत कार्यवाही होईल अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने विशाल मडवइ यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रतिनिधी बैठकीसाठी उपस्थित नव्हते. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जुन्या बस स्थानकावरील सार्वजनिक शौचालयाचा मुद्दा लक्षवेधी ठरला. यावेळी बोलताना आमदार राजळे म्हणाल्या, सर्व गणेश मंडळांनी उत्सवाचे पावित्र्याबरोबरच मंडळाच्या परिसराची स्वच्छता सुद्धा ठेवावी. पालिका निवडणुकीचे वारे सुरू झाल्याने सर्व तर गर्दी वाढेल. सर्वांनी स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य द्यावे. आदर्श मंडळाचा प्रशासनाने गौरव करावा. रस्त्यावरील अडथळे म्हणून ठरलेल्या व्यावसायिकांनी स्वतःच रस्ता अतिक्रमण मुक्त ठेवावा. हातगाडी फेरीवाले यांनी शिस्त पाळावी. प्रत्येक वेळी प्रशासनाने मोहिम हाती घेण्याऐवजी आपणच रस्ते मोकळे ठेवावेत. तात्पुरत्या स्वरूपात पालिकेने फिरते शौचालय ठेवावेत. एकीकडे स्वच्छतागृहाची मागणी करायची,दुसऱ्या बाजूने जागेचा मुद्दा पुढे करून अडथळा आणायचा. निदान विकास कामात तरी राजकारण नको. अशी पद्धत चुकीची आहे. पाथर्डी आगाराच्या बसेस कोकणात गणेशोत्सवासाठी पाठवण्याच्या मुद्द्यावर आपण विभाग नियंत्रकांची बोलून तालुक्यातील गणेशोत्सवात अडथळा येणार नाही याची काळजी घेण्याची सूचना करू. असे राजे म्हणाले. उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी प्रास्ताविक तर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments