राजेंद्र जैन / कडा - नवीन वर्षांचे स्वागत करताना दारू पिऊन रस्त्यावर धुमस्टाईल हुल्लडबाजी करणा-या वाहन चालकांवर पोलिस आता कठोर कारवाई करणार आहेत. तर तळीरामांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून मद्यपींना शोधण्यासाठी ब्रीथ अॅनालायझर यंत्रांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पोनि संतोष खेतमाळस यांनी दिली.
शहराप्रमाणेच ग्रामीण भागात देखील सन:२०२३ या सरत्या वर्षाला निरोप आणि २०२४ या नववर्षाचे स्वागत करण्याची मोठी उत्सुकता निर्माण झाली असून तरुणाईत थर्टी फस्टचा उत्सव साजरा करण्यासाठी जोरदार तयारी झाली. यावर्षी रविवारी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्षांचा स्वागतोत्सव करणे प्रत्येकाचा हक्क आहे. नव्या जमान्याबरोबर जाणे अनिवार्य असले तरी नव्या वर्षाचं स्वागत करताना इतरांच्या आनंदावर नववर्षात हुल्लडबाजीमुळे विरजण पडू नये, याची काळजी घेणे प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. मात्र काहींना याचा विसर पडत असल्याचे पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने रस्त्यावर दारू पिऊन हुल्लडबाजी करणे, धुम स्टाईल वाहने चालविणे, बेकायदेशीर वर्तन करणे, त्यातून उद्भवणारे अपघातातून होणारी इजा पोहचवणे, यासारख्या प्रकाराला आळा घालण्यासाठी मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. नववर्षांचे स्वागत करताना काही अनुचित घटना घडू नये, म्हणून प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करून मद्यपान करणा-या वाहन चालकांची तपासणी करण्यासाठी ब्रीथ अॅनालायझर यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस निरिक्षक संतोष खेतमाळस यांनी दिली.
नवीन वर्षांचे स्वागत करताना प्रत्येकाने गैर उत्साहाला मुरड घालण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वागत खर्चात कपात करून त्या पैशातून लोकोपयोगी उपक्रम घेऊन निराधार गरजुंना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याची गरज आहे असे पो.नि. संतोष खेतमाळस आष्टी यांनी सांगितले.
0 Comments