विखेंच्या बालेकील्यात लंकेचा सर्जिकल स्ट्राईक

 


पाथर्डी – ( हरिहर गर्जे ) लोकशाहीत मतदान आणि मतदाराला मोठे महत्त्व आहे. मतदानाच्या बदल्यात लोकप्रतिनिधींनी मतदारांची लोकशाही मार्गाने,नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी झगडावे,सेवा करावी असे अभिप्रेत आहे परंतु मतदारांच्या मुलभूत प्रश्नाची उकल करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले तर मतदार नाराज होतो याचा परिणाम आज पर्यंत अनेकांना पहावयास मिळाला आहे.

ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांनी अनपेक्षित पाथर्डी शेवगाव मतदार संघात येऊन व्यापारी तसेच नागरिकांच्या अगदी साधेपणाने भेटीगाठी घेत दीपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या,समस्या बाबत विचारपूस करतात अडचणीत नागरिकांना मदत करण्याचे आश्वासन देतात ही बाब राजकीय आखाड्यातील शड्डू ठोकून आव्हान देण्याची उल्लेखनीय मुहूर्तमेढ असूही शकते.

पाथर्डी सह शेवगाव तसेच पूर्व महाराष्ट्राला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ गेल्या सात वर्षापासून नूतनीकरणाच्या नावाखाली रखडलेला आहे यामुळे अनेक प्रवाशांना अपघाताला सामोरे जाऊन जीवित हानी वित्तहानी झालेली आहे परंतु या बाबीचे देणे घेणे परिसरातील कोणत्याही लोकप्रतिनिधीला असल्याचे गेल्या काही दिवसा पासून जनतेमधून झालेल्या विविध आंदोलना मधून दिसून येते. व्यापक जनहिताच्या प्रश्न सोडवणुकीसाठी केवळ आश्वासनांचा पाऊस वगळता रखडलेला राष्ट्रीय महामार्ग प्रश्न कामासंदर्भात ना लोकसभेत,ना  विधानसभेत याबाबत कधीही या भागाच्या लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केलेला ऐकीव अथवा वाचनीय नाही . परंतु यास अपवाद म्हणून की काय, की नवीन राजकीय आखाड्यातील शड्डू ठोकीत मतदारांचे लक्ष स्वतःकडे खेचण्यासाठी पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांनी मात्र विधानसभेत याबाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम मार्गी लावावे यासाठी प्रश्न उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पाथर्डी सह शेवगाव मतदार संघातून खासदार सुजय विखे यांना लोकसभेला मोठे मताधिक्य मिळाले होते याच मतदारसंघातून त्यांना विनासायास भरभरून मतदान मिळाले होते परंतु रखडलेला राष्ट्रीय महामार्ग हा प्रश्न ते गेल्या त्यांच्या तीन वर्षाच्या सत्ता काळात मार्गी लावू शकले नाहीत.याशिवाय गेल्या दोन दिवसापासून शेवगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नामदार राधाकृष्ण विखे यांच्या अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्याला विरोध करत त्यांना काळे झेंडे दाखवण्याची इशारा दिला त्यावरून शेवगाव तालुक्यात वातावरण चांगलेच तापलेले जाणवत आहे. ना.राधाकृष्ण विखे यांनी आज शेवगाव,बोधेगाव येथे  हेलिकॉप्टरने दौरा केला,मग त्यांना मतदार संघातील रस्त्यावरील खड्डे कसे दिसणार हा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.याशिवाय मतदारांच्या गावोगावचे विविध प्रश्न अजूनही अस्पर्शित असून ह्याच पोकळीचा फायदा घेऊन आमदार निलेश लंके येत्या लोकसभेला या मतदारसंघात आखाड्यात शड्डू ठोकण्याची तयारी करत आहेत का ? असा प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात उपस्थित होत आहे.

याशिवाय शेवगाव पाथर्डी मतदार संघात सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या दर्जाबाबत अनेक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत तसेच नवीन विकास कामांचा पाहिजे तसा प्रवाह मतदार संघात दिसून येत नाही. लोकप्रतिनिधींच्या अवतीभवती असलेल्या कार्यकर्त्यांच्या विकासाशिवाय सामान्य नागरिक अजूनही विकास अथवा विकास आश्वासनां पासून दूरच आहेत.त्यामुळे येत्या राजकीय समीकरणात कोण कुणाच्या,कोणत्या मुद्द्यावरून सर्जिकल स्ट्राईक करील हे पहायला मिळणार आहे. 


Post a Comment

0 Comments