सरकार नुकसान भरपाई देणार असेल तरच पंचनामे करा ! शेतकऱ्यांची व्यथा !


करंजी - " साहेब, सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असेल तरच पंचनामे करा" अशी व्यथा मिरी/करंजी परिसरातील अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेले शेतकरी पंचनामे करीत असलेल्या अधिकाऱ्यां समोर मांडीत आहेत.

या भागातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास सतत आठ दिवस कोसळणाऱ्या पावसाने हिरावून घेतला. करंजीसह परिसरातील सातवड, कौडगाव,जोहारवाडी, भोसे, दगडवाडी, खांडगाव, लोहार, बाभुळगावसह अनेक गावात तर मिरी परिसरातील मिरीसह आडगाव, कडगाव, शंकरवाडी, शिंगवेसह अनेक गावात अतिवृष्टीने सोयाबीन, कपाशी, तुर आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन या भागात तलाठी, ग्रामसेवक, व कृषि अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन नुकसानीचे पंचनामे करित आहेत. 



प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकरी "साहेब सरकार आम्हाला नुकसान भरपाई देणार असेल तरच पंचनामे करा" असे सांगुन आपली व्यथा या अधिकाऱ्यांसमोर मांडताना दिसत आहेत.   पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील मिरी, करंजी परिसरातील शेती संपुर्ण कोरडवाहू असल्याने या भागातील शेतकऱ्यांना एक किंवा दोन पिकावर समाधान मानावे लागते. त्या पिकाच्या भरवशावर ते आपला उदरनिर्वाह करतात. या भागातील पिके ऐन काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीने वाया गेली. शासनाने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचे आदेश दिल्याने या भागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन पंचनामे करित आहेत.या भागातील बहुतेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सरकारने सरसकट नुकसान भरपाई देवुन मदत करावी असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफिक शेख यांनी यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments