एमपीएससी परीक्षा संयमाची कसोटी पाहणारी – सुरेशराव आव्हाड


पाथर्डी - महाराष्ट्र शासनाच्या वर्ग १ व वर्ग २ अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. या परीक्षा उमेदवारांची कणखर वृत्ती, चिकाटी, जिद्द आणि संयम या गुणांची सत्वपरिक्षा घेणाऱ्या आहेत. मन लावुन अभ्यास, योग्य पुस्तकांचे वाचन, रिविजन व  पेपर सोडवण्याचा सराव तसेच मानसिक व शारिरीक स्वास्थ्य जपल्यास या परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड नाही असे प्रतिपादन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड यांनी केले. 

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात नुकत्याच एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या उमेदवारांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी पी ढाकणे, सत्कारमूर्ती यशस्वी उमेदवार निलेश पालवे (दारूबंदी शुल्क अधिकारी), प्रिया मचे, विवेक गर्जे (विक्रीकर निरीक्षक), किरण मोरे, गणेश मोरे व राजेंद्र पुंड (साहाय्यक विक्रीकर निरीक्षक), अजिंक्य मोरे, भारत मचे, जगन्नाथ मोरे, नितीन मोरे, स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. किरण गुलदगड, डॉ बबन चौरे, डॉ अशोक कानडे आदी उपस्थित होते.सुरेशराव आव्हाड विद्यार्थ्यांना संबोधित करतांना पुढे म्हणाले, स्पर्धा परीक्षा ही किचकट व वेळखाऊ प्रक्रिया असल्याने इतरांच्या सांगण्यावरून या परीक्षांची तयारी न करता आपली या परीक्षांप्रती आवड असल्यासच त्याची तयारी करावी. स्वप्न पाहण खूप सोपं आहे पण ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत व हिम्मत लागते आणि हे खूप कठीण काम आहे. त्यासाठी लागणारी मेहनत तुम्हालाच करावी लागणार असते. जर तुम्ही आत्मविश्वासानं, दृढ इच्छाशक्तीनं निर्णय घेतला तर तुम्हाला या परीक्षेत यश मिळणारच असे ते शेवटी म्हणाले. 

यावेळी निलेश पालवे, प्रिया मचे, किरण मोरे व गणेश मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना या स्पर्धा परीक्षेबद्दल आलेले अनुभव सांगितले. आत्मविश्वासपूर्ण व तयारीनिशी या परीक्षांना सामोरे जाण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ जी पी ढाकणे, सुत्रसंचालन डॉ अशोक कानडे तर आभार डॉ अजयकुमार पालवे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments