ई-पॉस मशिन मधील तांत्रिक अडचणीमुळे शिधावाटपात अडचणी

करंजी - ई-पॉस मशीनमध्ये कायम तांत्रिक अडचणी,ई-पाॅस मशिनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने, तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशनच्या धान्य वाटपात अडचणी येत असल्याने रेशनकार्डधारकांना मात्र काम सोडुन चार-चार दिवस लाईनमध्ये उभे रहावे लागत असल्याने पाथर्डी तालुक्यासह करंजी भागातील रेशनकार्ड धारक तर त्रस्त झाले आहेत पण रेशन दुकानदारही या त्रासास कंटाळले आहेत. 

शासनाने गोर-गरिबासाठी शिधापत्रिकेवर मोफत धान्य किंवा अल्प दरात तांदुळ, गहु तसेच इतर वस्तूचे वाटप करण्याची ही योजना अनेक वर्षापासुन सुरु आहे. ही योजना गोर-गरिबासाठी वरदान ठरलेली आहे. पण या योजनेत अधिक पारदर्शकता यावी, धान्य गोर-गरिबापर्यत जावे, भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून ऑनलाईन पध्दतीने हे धान्य वाटप करण्यासाठी ई-पाॅस मशिनव्दारे हे धान्य वाटपाचे काम सुरु आहे. ही योजनाही चांगली आहे मात्र त्याला येणाऱ्या अडचणींचा विचार केला गेला नसल्याने गोर-गरीब व हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना ही मशिन आता शापच ठरु लागली आहे. करंजी, मिरी, चिचोंडी परिसरातील सर्व लहान-मोठ्या गावात रोजंदारीवर जाणाऱ्या मजुरास कामाचे खाडे करुन तिन ते चार दिवस रेशन दुकानासमोर घालावे लागत आहेत. प्रसंगी नागरिक व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात शाब्दिक चकमक व शिवीगाळ घडल्याच्याही घटना या भागात घडल्या आहेत.  

ई-पॉस मशिनला सतत येणाऱ्या तांत्रिक समस्येमुळे धान्याचे ऑनलाईन वितरण होत नाही, रात्र-रात्र जागुन धान्य दुकानदार व दुकानातील कर्मचारी रेशनकार्ड धारकाच्या पावत्या काढीत असतात. चालु महिन्यातील धान्य वाटप करायचे होत नाही तर पुढचे धान्य येते. यामुळे तिन-चार दिवस मजुर कामावर न जाता रेशन दुकानासमोर उभे रहात असल्याने दोन्ही बाजूंनी उपाशी मरणाची वेळ या भागातील मजुरावर आली असल्याने या धान्य वाटप यंत्रणेत त्वरित सुधारणा करावी अशी मागणी या भागातील अनेक गावातील मजुरांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments