पाथर्डी - वंचित
बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत आज शहरातील
मेहर टेकडी परिसराला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर असे नाव देण्यात आले. या
फलकाचे अनावरण ही करण्यात आले. यानंतर या परिसरातील मूलभूत नागरी सुविधासाठी प्रा
चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वाजत गाजत थाली बजावो आंदोलन करत नगरपरिषदेवर मोर्चा
नेण्यात आला.
यावेळी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, प्यारेलाल शेख, अरविंद साळवे, सलीम शेख, सुनील जाधव, राजू पठाण, सोपान भिंगारे, युनूस शेख, बाळू दिनकर, सुनील दिनकर, किरण ससाने, संगीता दिनकर, आशाबी पठाण, मंदाताई दिनकर, नीता दिनकर आदींसह वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा किसन चव्हाण यांनी सत्ताधारी भाजप व प्रशासनावर सडकून टीका केली. चव्हाण म्हणाले की, पालिकेमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने शेकडो हजारो कोटीच्या विकासाच्या गप्पा केल्या असल्या तरी त्यांनी फक्त अधिकाऱ्यांशी संगणमत करून भ्रष्टाचार केला. सामान्य नागरिकांना मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मेहर टेकडी व ईदगाह मैदान परिसरातील नागरी समस्या, अस्वच्छता व नगरपालिकेचे या प्रश्नाकडे होत असलेले दुर्लक्ष व डोळेझाक पाहून मन सुन्न होते. शहरातील मध्यभागात असूनही या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा दिल्या जात नाहीत याबाबत आश्चर्य वाटते. या ठिकाणी येण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाहीत, सांडपाण्याची व्यवस्था होण्यासाठी गटारी नाहीत, अस्वच्छतेने तर कळस गाठला आहे. नियमित साफसफाई होत नसल्याने या ठिकाणी आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. पथदिवे व लाईटची कोणतीही व्यवस्था नाही. या ठिकाणी दिन दलित व गरीब नागरिक राहत असल्याने सत्ताधारी व प्रशासन या नागरिकांना मिळणाऱ्या मुलभूत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करीत आहे. मागील अनेक वर्षापासून या शहरात भाजपची सत्ता, भाजपाचे आमदार, भाजपची राज्यात सत्ता व केंद्र सत्ता असतानाही येथे राहणाऱ्या नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले गेले. व हे भाजपने जाणीवपूर्वक केले. येथील सर्व कारभार टक्केवारीवर चालत असल्याने हे सर्व होत आहे.असा आरोप हे यावेळी चव्हाण यांनी केला.
येथील नागरिक जागरूक झाल्याने आम्ही येथील स्वाभिमानी
नागरिकांसह त्यांना आगामी काळात जाब विचारू. सत्तेचाउ व पैशाच्या धुंदीत असलेल्या
अधिकारी पदाधिकारी व प्रशासनाची धुंद उतरू. सार्वजनिक स्वच्छतागृह, पथदिवे, रस्ते व पिण्याच्या
पाण्याची सार्वजनिक सुविधा व नियमित स्वच्छतेसह बंदिस्त गटाराची मागणी यावेळी किसन
चव्हाण यांनी केली या सुविधा तातडीने न मिळाल्यास नागरिकांसह मोठे आंदोलन करण्याचा
इशाराही त्यांनी यावेळी दिला.
0 Comments