करंजी - पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील दुष्काळी ३८ गावांची तहान
भागविणारी जलजिवन योजना एक असली तरी योजनेची उदघाटने मात्र दोन होत असल्याने या
भागातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असुन या भागातील नागरिकात मात्र याविषयी
उलट-सुलट चर्चा होत आहे.
पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग दुष्काळी म्हणुन ओळखला जातो. या भागातील अनेक गावात उन्हाळ्यात नेहमीच पिण्याच्या पाण्याची टंचाई असते म्हणुन या भागातील तहानलेल्या ३८ गावात जलजिवन मिशन अंतर्गत पिण्याची योजना राबविली जात आहे. या योजनेच्या श्रेयवादावरुन पुन्हा एकदा विखे, कर्डीले व तनपुरे गट समोरा-समोर आल्याने या भागात हा राजकिय कलगीतुरा रंगला आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी आपल्या समर्थकांची एक बैठक घेवुन या योजनेचे दि. ४ फेब्रुवारीस चिचोंडी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करण्याचे ठरविले असल्याचे समजते. तर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दि. ५ फेब्रुवारी रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तिसगाव येथे उदघाटन करण्याचे ठरविले असल्याची माहिती समजली आहे. एकाच योजनेचे दोन ठिकाणी उदघाटने होत असल्याने या भागातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.
पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागासाठी ही योजना वरदान ठरणारी आहे. या दुष्काळी भागातील ३८ गावांची तहान या योजनेमुळे भागणार आहे. हि योजना कोणी आणली? कोणी पाठपुरावा केला? या योजनेसाठी कोणी बैठका घेतल्या? हे न समजण्याइतकी या भागातील जनता दुधखुळी नाही. परंतु राजकारणात जनतेला बनवा-बनवी करण्याची संधी सोडली तर ते पुढारी शोभत नाहीत किंवा राजकारणच करता येत नाही असा समज झालेल्या पुढाऱ्यापेक्षा नागरिक हुशार झाले असल्याचे विसर यांना पडलेला दिसतो. एकाच योजनेचे दोन ठिकाणी होत असलेले उदघाटन पाहुन या भागातील सुज्ञ नागरिक मात्र दबक्या आवाजात काहीशी प्रतिक्रिया देताना दिसतात.
0 Comments