पाथर्डी
– तालुक्यातील मोठा आर्थिक गैरव्यवहार व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी तसेच स्थानिक
गुंडांशी या बोगस संस्था चालकांचे असलेले हितसंबंध ही अभद्र युती शिक्षकांच्या
जीविताला धोका निर्माण करणारी आहे म्हणून पर्यवेक्षणाचे काम हे शिक्षकांना न देता
त्रयस्थ यंत्रणांकडून करण्यात यावे अशी मागणी आज तालुक्यातील सर्व शिक्षक
संघटनांकडून करण्यात आली.
इयत्ता दहावी
बारावीच्या परीक्षांमध्ये पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांवरील हल्ल्याच्या वाढत्या
घटना लक्षात घेऊन पाथर्डी तालुक्यात पर्यवेक्षण करणे हे शिक्षकांच्या जीवितास धोका
निर्माण करणारे काम सिध्द झालेले असून तालुक्यात असलेल्या बोगस शिक्षण संस्था व
लाखो रुपये देऊन परीक्षेत कॉपी मिळण्याची हमी मिळण्यासाठी महाराष्ट्रभरातून येणारे
बोगस विद्यार्थी हे पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रातील अत्यंत विदारक चित्र
आहे. करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल या निमित्ताने होत असल्यामुळे संस्थाचालकांचे
प्रशासकीय अधिकाऱ्यांशी व स्थानिक गुंडांशी अर्थपूर्ण हितसंबंध आहेत.
परिणामी
प्रामाणिकपणे पर्यवेक्षणाचा काम करणाऱ्या शिक्षकांवर जीवघेणे हललल्यांची मालिका
विधानसभेत या हल्ल्यांचे पडसाद उमटल्यानंतर देखील थांबलेली नाही. सातत्याने
शिक्षकांवर अशा प्रकारचे हल्ले झालेले असून सुद्धा प्रशासन दरबारी त्याची दखल
घेतली जात नाही. टाकळी मानूरच्या घटनेत कॉपी विरोधी पथकातील शासकीय कर्मचारी कॉपी
पुरवणाऱ्या जमावाकडून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला असताना देखील त्यांना
त्याची फिर्याद घेतली नाही व पोलीस स्टेशनमध्ये महिलांना आणून त्यांच्या वरती
स्त्री अत्याचार च्या खोट्या फिर्यादी दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. श्री
तीलोक जैन विद्यालयातील शिक्षकावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर फिर्याद देण्यासाठी
शिक्षक पोलीस स्टेशन मध्ये गेला असताना देखील काही मुलींना पोलीस स्टेशनमध्ये आणून
आणून त्याच्यावर देखील स्त्री अत्याचाराची फिर्याद करण्याचा बनाव रचण्यात आला. हा
निव्वळ योगायोग नाही तर हा एक मोठ्या रचनाबद्ध कारस्थानाचा भाग आहे.
0 Comments