पाथर्डी - (हरिहर गर्जे) तालुक्यात गत विधानसभा निवडणुकीत पंकजा
मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहून तालुक्यातील जनतेने भाजपा
उमेदवाराला भरघोस मते देवून निवडून दिले होते मात्र त्या नंतरच्या कालावधीत मुख्यमंत्रीपद
सोडा परंतु राज्याच्या राजकीय पटलावरून पंकजा मुंडे यांना बाजूला करण्यात आल्याने
तालुक्यातील मुंडे समर्थकात नाराजी वाढली असून माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी आजीचे
नाते असलेल्या पाथर्डी तालुक्याचे राजकीय संबंध पक्षा अंतर्गत राजकीय कुरघोड्या
मुळे दुरावत चालल्याची चर्चा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात झडत आहे.
भगवानगड व ४६ गावांना
जायकवाडी धरणातून पिण्याच्या पाण्याच्या सुमारे २०० कोटी रुपयांचे भूमिपूजन विरोधी
पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते मागील आठवडयात पाथर्डी येथे झाले त्यापूर्वी
काही दिवसांपुर्वी आमदार मोनिका राजळे समर्थकांनी
संबंधित गावांमध्ये फटाके वाजून व नेत्याच्या कौतुकांचे फलक लावून आनंदोत्सव केला.
आता पुन्हा याच योजनेच्या भूमिपूजनाचे निमंत्रण घेऊन तालुक्यातील निवडक राजळे
समर्थक पंकजा मुंडे यांचे कडे गेले मात्र सोबत नेलेले निमंत्रण न स्वीकारता त्यांनी आलेल्यांना चांगलेच
सुनावले असून ‘’ मी भूमिपूजनाला तालुक्यात येणार नाही,मी आता कोणत्या पदावर नाही,अन्य
मोठे नेते कोणीतरी बोलवा ’’ असे सांगत अन्य मुद्द्यांची चर्चा केली. पंकजा
मुंडे यांना भेटायला गेलेल्या या शिष्टमंडळात पाथर्डी पालिकेचा एक माजी पदाधिकारी तसेच
पूर्व भागातील माजी सरपंच, टाकळीमानुर परिसरातील राजळे यांचा
निकटवर्ती कार्यकर्ता, मुंडे यांच्या नातेसंबंधातील एक
कार्यकर्ता ' पक्ष संघटनेचा एक पदाधिकारी ' सहकारी संस्थेचा एक संचालक यांचा समावेश होता. त्यांनी मागील आठवड्यात
मुंडे यांची भेट घेतली,मात्र चर्चे नंतर शिष्ट मंडळाच्या पदरी निराशा पडल्याने घडला
प्रकार गावाकडे कोणालाही सांगायचं नाही अशा शपथविधीसह सर्व शिष्ट मंडळाचा ताफा पाथर्डी
तालुक्यात परतला.
मात्र दोन-चार दिवसांनी ही खबर व्हायरल झाली या विषयावर आता
संपूर्ण तालुक्यात उलट सुलट राजकीय चर्चा सुरू झाली असून. पुन्हा त्याच योजनेच्या
भूमिपूजनासाठी राजळे समर्थकांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
यापूर्वी भेटले.या महिन्यात ऊपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाथर्डी तालुका
दौरा जाहीर होण्याची शक्यता आहे.
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे परळीला आई तर पाथर्डी तालुक्याला
मावशीचा तालुका म्हणून नेहमी म्हणायचे. तोच धागा पकडत काही काळ पंकजा मुंडे यांनी
आजीचा तालुका असा उल्लेख करत समर्थकांना प्रोत्साहन दिले. १९९२ पासून गोपीनाथ मुंडे यांचा संपर्क तालुक्यात
वाढत जाऊन त्यांची लोकप्रियता तालुक्यात शिगेला पोहोचली, तालुक्यातील त्यांचे
समर्थक त्यांना दैवत मानू लागले. भगवान गडावरील दसरा मेळाव्याकडे मुंडे यांनी
राज्याचे लक्ष वेधून समाज संघटन केले. त्यांचा राजकीय वारसा म्हणून त्यांनी स्वतःच
भगवानगडावर पंकजा यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर पाथर्डी तालुक्यात पंकजा
पर्व सुरू झाले आमदार मोनिका राजळे यांना त्यांनी बहीण मानून त्यांच्या राजकीय वर्तुळात
महत्वाचे स्थान दिले.
राज्याच्या राजकीय पटलावर पंकजा मुंडे यांना टाळून आमदार मोनिका
राजळे यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे धोरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी घेतल्यानंतर मुंडे यांच्या समर्थकांची तालुक्यात
स्वतंत्र निती सुरू झाली. गेल्या काही दिवसा पूर्वी तालुक्याच्या जवळच असलेल्या
गहीनाथ गडावरील कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांची गैरहजेरी व आ.राजळे यांची उपस्थिती
चर्चेचा विषय झाला. पंकजा यांचा पाथर्डी तालुक्यातील त्यांच्या समर्थकांबरोबर
संपर्क असुन तो आढावा त्यांना नियमीत मिळतो. काही
समर्थकांशी त्या मोकळेपणाने चर्चा करतात. काही दिवसांपूर्वी पंकजा यांचा पर्यायी
मतादार संघ म्हणून पाथर्डीकडे पाहिले जाईल. झालेल्या घडामोडी वरून आता मात्र पंकजा
तालुक्यात सुद्धा यायला तयार नाहीत.भगवानगडाच्या राजकीय भाषण बंदीमुळे पंकजा यांना
गोपीनाथ गडाची स्थापना करावी लागली तालुक्यात यायला व नेतृत्वाची उंची दाखवायला
गडाची जागा अत्यंत सोयीची होती.
सर्व प्रकारे भगवानगड आज स्वयंभू असून राज्यकर्त्यांची गडावर वेळोवेळी व्यक्त होणारी श्रद्धा पंकजा समर्थकांना पर्यायी नेतृत्वासारखी वाटते पंकजा यांच्या पाथर्डीच्या सभेला गर्दी नव्हती तो विषय भाजपा अंतर्गत चर्चेचा ठरवून आमदारांनी गांभीर्याने सभा हाताळली नाही असे मुंडे समर्थकांचे मत बनुन मतभेदाची दरी वाढायला लागली त्या दौऱ्यामुळे अशा मतभेदांना पुढील कालावधीत बळकटीच मिळाली. पंकजा यांचा आजही पाथर्डी तालुक्यावर प्रेम आहे. त्यामुळे आता आमदार राजळेना नवराजकीय फॉर्मुला अमलात आणून मतदार संघाची बांधणी करावी लागणार आहे. आमदार मोनिका राजळे यांनाही आता कार्यपद्धती व रणनीती मध्ये बदल करण्याशिवाय पर्याय नाही राजळे - मुंडे संबंधाबाबत मात्र पक्षातील अन्य नेते मौन बाळगून आहेत.पारंपारिक जातीवाद वाढणार नाही याकडे नेत्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.भगवानगड पाणी योजनेच्या तिसऱ्यांदा होणाऱ्या सेलिब्रेशन नंतर राजकीय घडामोडींना खऱ्या अर्थाने वेग येणार आहे.त्यानंतर तालुक्यात नगरपालिका ' जिल्हा परिषद पंचायत समिती व लगेचच लोकसभेच्या निवडणुका पाटोपाठ येणार असल्याने या कार्यक्रमाकडे भाजपा अंतर्गत सर्वच गटातटांचे लक्ष लागले आहे .
0 Comments