पाथर्डी - ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत आहेत ही तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असून विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेऊन आपल्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा घ्यावी. स्पर्धा परीक्षा सोपी नसून प्रचंड मेहनत, कष्ट व संयमाची परीक्षा पाहणारी असते. यामध्ये संघर्ष हा ठरलेला असून त्याशिवाय यश मिळत नाही. असे प्रतिपादन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले. नुकत्याच एम पी एस सी परीक्षेत तालुक्यातील 9 विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष नंदुशेठ शेळके, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, वडगावचे सरपंच आदिनाथ बडे, चेअरमन आजिनाथ बडे, सुरेश गरड, प्रल्हाद बडे, मधुकर बडे, सचिन खेडकर, शहादेव आंग्रे आदी उपस्थित होते.
अभय आव्हाड पुढे म्हणाले, पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थांनी अभ्यास आणि चिकाटी या बळावर हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मेहनती असून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते कोणतेही ध्येय प्राप्त करू शकतात. तालुक्यात एम पी एस सी तसेच युपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान व त्यांना आलेले अनुभव महाविद्यालयातील विद्यार्थांसाठी आपल्या भविष्याची वाटचाल करण्यासाठी महत्वाचे ठरतात.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या सतीश बडे व मनीषा खेडकर यांनी आपले अनुभव कथन करून विद्यार्थांच्या स्पर्धा परीक्षाबाबतच्या शंकांचे निरसन केले. यावेळी पोलीसपदी निवड झालेल्या विजय बडे यांचाही सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ जी पी ढाकणे, सुत्रसंचालन डॉ. अशोक कानडे तर आभार डॉ भगवान सांगळे यांनी मानले.
0 Comments