कडा / वार्ताहर - दारुड्या मुलाने बापाला दारू प्यायला पैसे मागितले. मात्र जन्मदात्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने निर्दयी मुलाने लाकडी दांडक्याने केलेल्या जबर मारहाणीत बापाचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी ब्रह्मगाव येथे घडली. मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरुन आष्टी पोलीसांत सोमवारी आरोपी मुलाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील कांतीलाल सूर्यभान नरवडे (वय- ५४) यांना त्यांचा दारुडा मुलगा योगेश कांतीलाल नरवडे यांने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु वडील कांतीलाल नरवडे यांच्याकडे पैसे नसल्यामुळे मुलाला पैसे देण्यास त्यांनी नकार दिला. याचाच राग अनावर झाल्याने मुलगा योगेश नरवडे या दिवट्याने जन्मदात्या बापालाच लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. त्यामुळे उपचारार्थ त्यांना नगरला हलविण्यात आले होते. मात्र मारहाणीत गंभीर जखमी झालेले वडील कांतीलाल नरवडे यांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणी मयताची पत्नी नर्मदाबाई कांतीलाल नरवडे यांच्या फिर्यादीवरून मुलाविरुध्द सोमवार दि. १० रोजी आष्टी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अजीत चाटे करीत आहेत.
0 Comments