राजेंद्र जैन/कडा - शासनाकडून यावर्षी नवी पीक विमा योजना राबविण्यात येत असून केवळ एक रूपयामध्ये पीक विमा भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आष्टी तालुक्यातील शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी गोरख तरटे यांनी केले आहे.
राज्यात सन २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यापूर्वी पीक विमा योजनेत खरीप हंगाम दोन टक्के, रब्बी हंगाम १.५ टक्के तर नगदी पिकांसाठी पाच टक्के पीक विम्याचा हप्ता शेतक-यांना भरावा लागत होता. उर्वरित शेतक-यांच्या हप्त्याची रक्कम राज्य शासन देत होते. या वर्षीपासून शेतक-यांना खरीप व रब्बी या हंगामांसाठी केवळ एक रूपया भरावा लागणार आहे. उर्वरित शेतक-यांच्या हिश्श्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे. शासनाने सन २०२३-२४ सालच्या आर्थसंकल्पात या संदर्भात घोषणा केली असून त्याची अंमलबजावणी होत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून एक रुपयांत पीक विमा भरावा, विम्याची रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत असून, बाजरी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, मका इत्यादीसाठी हा पीक विमा भरावयाचा आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतक-यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जावून ज्या पिकाची पेरणी केली, त्याच पिकाचा विमा भरणे आवश्यक आहे. तसेच कर्जदार शेतक-यांनी बॅंकेमार्फत विमा भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मुदतीच्या आत सर्व शेतक-यांनी पीक विमा भरून घ्यावा असे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, यांनी सांगितले.
---
नुकसान झाल्यास मिळणारी भरपाई -
- १) कमी पर्जन्यमानामुळे ७५ टक्क्यांपेक्षा पेरणी कमी झाल्यास विमा घेतलेल्या सर्वांना भरपाई.
- २) हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पूर, पावसाचा खंड यामुळे उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास नुकसान भरपाईच्या प्रमाणात २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येते.
- ३) नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास ७२ तासामध्ये कंपनी पोर्टलवर किंवा कंपनी प्रतिनिधींना कळवणे. यात वैयक्तिक पंचनामा कृषी सहाय्यक, कंपनी प्रतिनिधी, शेतकरी करतील. त्यात गारपीठ, शेत पिकात पाणी साठणे, अतिवृष्टी, नैसर्गिक आगीमुळे नुकसानीचा समावेश.
- ४) काढणी नंतर दोन आठवड्यापर्यंत शेतात सुकविण्यासाठी ठेवल्यावर गारपीट, पावसामुळे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत कंपनीस कळवावे व पंचनामा करावा.
0 Comments