रिमझिम रिमझिम करत बरसणाऱ्या पावसाच्या धारा..... मध्येच हळुवारपणे डोकेवर करून डोकावणारा,सर्वांना हुलकावणी देणारा,ऊन सावलीचा खेळ खेळणारा सूर्य... आकाशात इंद्रधनुष्याने उभारलेले बांध..... सगळी कडे हिरवेगार रान..... ओसाड जमिनीवर आलेलं मऊ लुसलुशीत गवत ... कुठेतरी डोंगरावरून धो धो करत खाली येणारे ते धबधबे ... डोकेवर करून डुलणारी रानफुले... वा! वा! वा!..... किती! किती! सुंदर, आल्हादायक मनमोहक ते दृश्य..... आनंदायी, वातावरण.... मन प्रफुल्लित करून टाकणारे तो निसर्ग... अशा सर्वांना हवाहवासा, सर्वांचा आवडीचा श्रावण महिना.....
श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.....
या बालकवींच्या कवितेच्या ओळी आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातात. श्रावण महिन्यात निसर्गात होणारा बदल ज्याप्रमाणे आपल्याला जसा हवा हवासा वाटतो तसाच हा महिना हिंदू धर्मांतील पवित्र, व्रतवैकल्याचा, सणसमारंभाचा महिना म्हणून ही तेवढाच हवाहवासा आहे. या महिन्यात भगवान महादेव आणि देवी पार्वतीची पूजार्चना केली जाते. या महिन्यात अनेक सण येतात त्यापैकी पहिला सण येतो. श्रावण शुक्ल पंचमीला नागदेवतांची पूजा केली जाते हा दिवस नागपंचमी चा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी झोके बांधले जातात. सासुवाशीण मुलीला माहेरी आणले जाते. माहेरी आलेल्या सासुरवाशीण मुलगी आपल्या सख्यांना भेटते.संसारातील सुख दुःखाचा सारीपाट मांडत असताना, मन मोकळं करून सख्याना समजून घेण्याचे हक्कांचे क्षण हा महिना देऊन जातो. यानंतर श्रावण पौर्णिमेला येणारा सण हा नारळी पौर्णिमा तसेच रक्षाबंधन या नावाने ओळखला जातो..हा सण समुद्रकिनाऱ्यावर राहणारे लोक समुद्र देवतेची नारळ अर्पण करून पूजा करतात.. या दिवशी नारळीभाताचा नैवद्य अशा बेत केला जातो. तसेच बहीण भावाच्या अतूट, पवित्र नात्याचा सुद्धा हा सण आहे, या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याचे औक्षण करते, त्याला दीर्घ आयुष्य लाभावे या साठी देवाकडे मागणं मागते ,तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचा विडा उचलतो... त्यानंतर चा सण असतो, श्री कृष्ण जन्माष्टमी. हा सण श्रावण महिन्यातील अष्टमीला साजरा केला जातो. श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री भाऊ कंसाचा अत्याचार सहन करणारी त्याची बहीण देवकी व तिचे पती वासुदेव यांचे आठवे अपत्य म्हणून भगवान श्रीकृष्ण यांनी जन्म घेतला पृथ्वीला कंसाच्या अत्याचारापासून आणि दहशती पासून मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी अवतार घेतला होता. या आख्यायिकेनुसार दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो.तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो, या दिवशी दहीहंडी असते. यामध्ये सर्वजण अत्यंत उत्साहाने सहभागी होतात... लहान मोठी मुले गोपाळ, गोविंद, कान्हा, केशव अशा वेगवेगळ्या वेशभूषेत तयार होऊन“गोविंदा आला रे आला”चा जयघोष करत दहीहंडी फोडली जाते... यानंतर चा सण असतो बैलपोळा... हा सण श्रावणी अमावस्येला येतो... या सणाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे. आपली भारतभूमी ही कृषिप्रधान आहे.येथे शेतकरी वर्ग मोठ्याप्राणावर आहे. बैल म्हणजे शेकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र आहे. त्यांच्या जीवावर शेतकरी शेत नांगरतो, जमिनीतून धान्य पिकवतो. शेतकऱ्यांप्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबत असतात आणि शेतकऱ्यांसाठी कष्ट करत असतात. अशा या कष्टकरी मित्राची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या दिवशी बैलांना सजवले जाते, झुल चढवली जाते , शिंगांना रंग, गुलाल लावून सजवले जातात, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो... नंतर सर्व बैलांना संध्याकाळच्या वेळी एकत्र आणले जातात.. हा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो... याच श्रावण महीन्यातील कृष्णपक्षातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असे ही म्हणतात.ती हरियाली अमावस्या (Hariyali Amavasya) म्हणून ही ओळखली जाते. देशातील अनेक ठिकाणी हा दिवस पर्यावरण संरक्षण दिवस म्हणूनही साजरा करतात. हा दिवस शेतकऱ्यांसाठी खूपच खास मानला जातो. या दिवशी लावलेल्या झाडांची वाढ चांगली होते असे समजण्यात येते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या दिवशी वृक्षारोपण करण्यात येते. या दिवसापासून शेतीची कामं चालू करण्यात येतात.
याचप्रमाणे या महीन्यात अगदी श्रावणी सोमवार, रविवारची पूजा, मंगळागौरीचा उपवास, श्रावणातील शुक्रवारी जिवतीची पूजा,असे बरेच सणसमारंभ त्यांचे महत्त्व, पूजा ,आरती ,उपवास या सर्व बाबी विचारात घेऊन साजरे केले जातात.. फेर धरणे, पिंगा घालणे, फुगडी खेळणे, होडी , सुप, घागर नृत्य करणे, या सारखे वेगवेगळे,अप्रतिम खेळ महिला या महिन्यातील वेगवेगळ्या सणाच्या निमित्ताने एकत्र येऊन खेळतात.
श्रावण महिन्याचे धार्मिक, पौराणिक आणि सांस्कृतिक महत्त्व अगाध आहे. हा आनंदाचा आणि भक्तीचा काळ आहे असे म्हणल्यास ते वावगे ठरणार नाही. जो आपल्या मराठी संस्कृतीतील व्यक्तींनी हा ठेवा जपून ठेवला आहे. उत्साही सणांसह ऊन आणि रिमझिम पावसाचा मनमोहक संवादमुळे श्रावण महिना खऱ्या अर्थाने सणांचा राजा असल्याने स्पष्ट होते- (दुर्गा भगत)
0 Comments