मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प कार्यान्वित

 


पाथर्डी - माणिकदौंडी येथील सौर प्रकल्पामुळे माणिकदौंडी व आल्हणवाडी परिसरातील शेतीपंप वाहिन्यांना दिवसा वीजपुरवठा होईल. यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाण्याची गरज भासणार नाही, तसेच प्राण्यांच्या हल्ल्यांचा धोका कमी होईल. शेतीसाठी सिंचनाची कामे दिवसा सुरक्षितपणे आणि सुलभतेने करता येतील. पुढील दोन वर्षांत तालुक्यातील साकेगाव, येळी, मिडसांगवी, शेवगाव आणि चापडगाव येथेही असे प्रकल्प उभारले जाणार असून, संपूर्ण मतदारसंघाला दिवसा वीज मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

तालुक्यातील माणिकदौंडी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत ३ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते मंगळवारी झाला. हा जिल्ह्यातील पहिला विकेंद्रित सौर प्रकल्प असून, यामुळे माणिकदौंडी परिसरातील सुमारे ५,००० शेतकऱ्यांना दिवसा आठ तास अखंड वीजपुरवठा मिळणार आहे.महावितरण आणि आवादा कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून माणिकदौंडी येथील शेळके वस्तीवरील १६ एकर शासकीय जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मिशन २०२५अंतर्गत महाराष्ट्रात ७,००० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प त्याच दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

आमदार राजळे यांनी याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी प्रकल्प मंजुर केल्याबद्दल तालुक्याच्या वतीने  विशेष आभार मानत हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात समख्याप्रकाश आणणारा ठरेल, असा विश्वासही आमदार राजळे यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पाचा लाभ माणिकदौंडी, पिरेवाडी, आठरवाडी, सुरसवाडी, जाटदेवळा, नाकाडेवाडी, लांडकवाडी, बोरसेवाडी, कोठेवाडी, चितळवाडी, चेकेवाडी, धनगरवाडी, पटेलवाडा, घुमटवाडी आणि आल्हणवाडी येथील वाड्या,वस्त्या व तांड्यावरील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना होणार आहे.


Post a Comment

0 Comments