राजेंद्र जैन/ कडा - बहिण- भावाचं नातं म्हटलं की की, कधी भांडण, कधी रुसवा, तर कधी क्षणात गोडी...हेच या नात्याचं वैशिष्ट्य.. या राखीच्या रेशमी धाग्यातील प्रेमाचा रंग पंचाहत्तर वर्षानंतरही रक्षाबंधनाचं औचित्य साधून दरवळताना दिसत आहे. वयाची नव्वदी पार केलेल्या लक्ष्मीबाई आजही सुर्यभान या लाडक्या वृध्द भाऊरायाला थरथरत्या हाताने राखी बांधून दीर्घायुष्याचे चिंतन करुन औक्षण करतात. बहिण-भावाचं अतूट नातं नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी म्हणावं लागेल.
आष्टी तालुक्यातील कडा येथील श्रीमती लक्ष्मीबाई श्रीपती जाचक या नव्वदी पार केलेल्या आजीबाई व त्यांचे लहान भाऊ सुर्यभान नारायण ढोबळे या वृध्द बहिण-भावाचं अतुट नातं चक्क पंचाहत्तर वर्षानंतरही राखीच्या रेशमी धाग्यात घट्ट गुंफलेलं आहे. मागील एैशी वर्षापासून वृध्द बहिण-भाऊ आवर्जून एकमेंकाच्या सुख- दु:खात सहभागी होतात. यांच्या भेटीतून आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा काय असतो, तो पाहायला मिळत आहे. रक्षाबंधन असो की भाऊबीज किंवा इतर कुठलाही सण- उत्सव साजरा करण्यासाठी ही भावंडं नियमित भेटतात. यांच्या नात्यातील तो प्रेमाचा रंग एवढ्या वर्षानंतरही दरवळताना कायम दिसत आहे. आज रक्षाबंधनाचं निमित्त साधून वयाची नव्वदी पार लक्ष्मीबाई आजही लाडक्या भाऊरायाला थरथरत्या हाताने राखी बांधून भावाच्या तोंडात पेढा भरुन दीर्घायुष्याचे चिंतन करून औक्षण करतात. या वयातील बहिण-भावाचं प्रेम पाहून " सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी ही माया"... हे भाऊबीज या मराठी चित्रपटातील दोघांतील नातं दृढ करणारं ह्दयस्पर्शी गीत ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. या वृध्द भावडांचं असलेलं अतूट नातं नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे.
0 Comments