आष्टी परिसरात पोलिसांची ताडी केंद्रावर कारवाई

 

कडा / वार्ताहर- आष्टी परिसरातील फुलेनगर येथे घरामध्ये बेकायदेशीरपणे ताडी बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात तीनशे लिटर ताडी व इतर साहित्य जप्त करून नष्ट केले. याप्रकरणी एका इसमावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोनि खेतमाळस यांनी अवैद्य धंद्याविरोधात जोरदार मोहीम उघडल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

आष्टी येथील फुलेनगर येथील चांगदेव मारुती वाल्हेकर हा इसम राहत्या घरात बेकायदेशीर ताडी तयार करून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी बुधवार दि. २३ रोजी त्या घरामध्ये छापा मारुन दोन निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या टाकीमध्ये पंधरा हजार रुपयाची रसायन मिश्रित तीनशे लिटर ताडी तसेच त्यासाठी लागणारे साहित्य पंचासमक्ष ताब्यात घेऊन पंचनामा करून नष्ट करण्यात आले. याबाबत पोकाॅ विलास गुंडाळे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे हे करीतत आहेत. सदर कारवाई पोनि. संतोष खेतमाळस, सपोनि विजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे, नामदेव धनवडे, पोकाॅ बब्रुवान वाणी, प्रविण क्षिरसागर, विलास गुंडाळे यांनी केली. पोनि खेतामाळस यांनी पोलिस ठाण्याचा पदभार हाती घेतल्यापासून ठाण्यांतर्गत बेकायदेशीर धंद्यांवर कायद्याचा दंडूका उगरल्यामुळे अवैध धंद्यांवाल्याची चांगलीच भंबेरी उडाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांतून पोलिसी कारवाईचे स्वागत होताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments