नवरात्रीत दीड लाख महिला भाविक मोहटादेवी दर्शनाला - आ.लंके


पाथर्डी: नवरात्रोत्सव काळात पारनेर-नगर मतदार संघातील सुमारे दीड लाखा पेक्षाही जास्त महिला मोहटादेवी दर्शनासाठी येतील. या यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते होणार असून या देवदर्शन यात्रा सोहळ्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून दररोज सुमारे १२५ ट्रॅव्हल्स व शंभर इतर चारचाकी वाहनांची सोय करण्यात आली आहे. ही सर्व यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी सुमारे 1000 स्वयंसेवक तन मन धनाने अहोरात्र कार्यरत राहणार असून यासाठी मोहटा देवस्थानसह मोहटा ग्रामस्थ व तालुक्यातील कार्यकर्त्यांचे मोठे सहकार्य लाभत आहे अशी माहिती पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी मोहटा येथे पत्रकार परिषदेत दिली.

आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मोहटादेवी दर्शन यात्रेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी लंके मोहटादेवी गडावर आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष रविंद्र उर्फ भोरू म्हस्के, रणजित बेळगे, अर्जुन धायतडक, उबेद आतार, महेश दौंड, धनंजय घोडके, संदिप पालवे, महादेव दहिफळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना लंके म्हणाले की, मागील ७ वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी नवरात्रोत्सव काळात मोहटादेवी दर्शन यात्रा आयोजित करण्यात येते. आजपर्यंत या उपक्रमाला  पारनेर नगर तालुक्यातील जनतेने मोठा प्रतिसाद देत लाखो महीला भाविकांनी याचा लाभ घेतला. कालपर्यंत सुमारे 92 हजार महिलांची नोंदणी पूर्ण झाली असून ही संख्या सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. यावर्षी गडावर येणाऱ्या इतर भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी देवस्थान व प्रतिष्ठानने घेतली असून या यात्रेतील भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग निर्माण करण्यात येणार आहे. स्वतंत्र वाहनतळ, फराळाची व्यवस्था व इतर सुविधा यात्रेकरूंना देण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे प्रतिष्ठानचे १००० स्वयंसेवक दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. मागील सर्व यात्रेचा अनुभव लक्षात घेता देवस्थान व प्रशासनाशी बोलणी झाली असून वाहतूक कोंडी होणार नाही. 

नगर पाथर्डी दरम्यानचे राष्ट्रीय महामार्गाचे काम आम्ही केलेल्या आंदोलनानंतर पूर्ण झाले असून यावर्षी त्यामुळे भाविकांचा प्रवास सुखरूप होणार आहे. अनेक वर्षे रखडलेला राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वाच्या श्रेयवादात मला पडायचे नसून सर्व जनतेला माहित आहे कोणाच्या प्रयत्नामुळे हा रस्ता पूर्ण झाला. या रस्त्यासाठी केलेल्या आंदोलना दरम्यान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शिष्टाईनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे सहकार्य लाभले.  मोहटादेवी व पाथर्डी तालुक्याशी माझे एक वेगळे नाते आहे. इकडे आल्यावर मला असे कधीच वाटले नाही की मी पारनेर तालुक्याच्या बाहेर आहे. पारनेर नगर मतदार संघ हे माझे कुटुंब आहे असे मी मानतो व कुटुंबप्रमुखाच्या कर्तव्यातूनच ही यात्रा घडवून आणतो. यामागे कुठलेही राजकारण, राजकीय  हेतू किंवा अपेक्षा आमची नाही. मी स्वतः व आमचे प्रमुख कार्यकर्ते, स्वयंसेवक यात्रेच्या सर्व व्यवस्था व सर्व ठिकाणी कार्यरत असून अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहोत. प्रसंगी रस्त्यावर वाहतूक कोंडी, वाहन दुरुस्ती, जेवण वाटप आदी कामेही आम्ही निरपेक्ष व सेवाभावी वृत्तीने करतो म्हणूनच ही यात्रा यशस्वी होते यासाठी सर्वांचे आशिर्वाद व सहकार्य लाभते. या यात्रा यशस्वीतेसाठी पाथर्डीकरांचे खूप मोठे योगदान मिळते असे शेवटी लंके म्हणाले.

Post a Comment

0 Comments