देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे कुटुंब मात्र असुरक्षित !

 

मिरी -आम्ही सीमेवर स्वतःच्या जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता संपुर्ण देशाचे रक्षण करतो, परंतु गावाकडे मात्र आमचेच कुटुंब सुरक्षित नसल्याचे पाहुन अतिशय दुःख होते अशी संतप्त भावना काल रात्री चोरट्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या कारभारी शिरसाट यांच्या सैन्यातील मुलगा अक्षय याने व्यक्त केल्यावर उपस्थित ग्रामस्थांचे डोळे पाणावले. 

               मिरी-मोहज रस्त्यालगत व कडगावचे रहिवाशी असलेले कारभारी रामदास शिरसाट हे आपल्या वस्तीच्या जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते, पत्र्याच्या शेडमध्ये दहा ते बारा गोण्या कापुस गोळा करुन आणलेला होता. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कापसाने भरलेल्या गोण्या चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी शेडमध्ये प्रवेश केला. काही गोण्या जवळच असलेल्या ऊसात नेऊन टाकल्या. परंतु गोण्या नेत असताना कारभारी शिरसाट यांना जाग आली. ते जागे झाल्याची चाहुल चोरट्यांनी लागताच चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात कारभारी शिरसाट यांचा जागीच मृत्यु झाला. त्यांचा मोठा मुलगा अमोल व सैन्यात असलेला अक्षय यांनी कुटुंबावर झालेल्या आघाताबद्ल तिव्र दुःख व्यक्त केले. तालुक्यातील पश्चिम भागात गुन्हेगारीच्या व चोऱ्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विहिरी मोटारी, इंजिन, सौर उर्जेचा पंप चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडत आहेत. या घटनेने तर संपुर्ण परिसरच हादरुन गेला असुन वाड्या-वस्त्यावर व मळ्यात रहाणार्‍या लोकांत प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले असुन कडगाव शिवारात चोरट्यांच्या मारहाणीत शेतकऱ्यांचा झालेल्या मृत्युच्या घटनेचा तपास त्वरित न लागल्यास कडगाव ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा दत्तु कोरडे, सुदाम गिते, भागचंद शिरसाट, भास्कर शिरसाट, सोन्याबापु शिरसाट, बाबाजी शिरसाट, आदिनाथ शिरसाट, बाबासाहेब शिरसाटसह अनेक ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments