पाथर्डी - सकारात्मक दृष्टिकोन, चांगल्या कामाची
दखल घेऊन प्रोत्साहन देत समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने माध्यमांची भूमिका लक्षवेधी
ठरते. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वात मोठा नवरात्र
कालावधीचा बंदोबस्त करून सर्वांनी कर्तव्य बजावले. एकही गुन्हा दाखल नसलेली मोहटा
यात्रा वैशिष्ट्यपूर्ण ठरली. असे मत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी व्यक्त
केले.
मोहटा यात्रा बंदोबस्त चोख बजावून भाविकांना सुरळीत, सुरक्षित व
समाधानकारक दर्शन मिळवून देत पोलीस दलाने मोठी मेहनत घेतली. राज्याच्या विविध
भागातून लाखो भाविकांनी नवरात्र कालावधीमध्ये दर्शनाचा लाभ घेतला. विशेषतः पाचव्या
माळेपासून गर्दी वाढली. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत वाढती गर्दी राहिली. अशा
वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल पोलीस दलाचा प्राथमिक स्वरूपात पोलीस निरीक्षक संतोष
मुटकुळे व पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, रामेश्वर कायंदे व श्रीकांत डांगे यांचा गौरव पत्रकारांच्या वतीने
करण्यात आला. पत्रकार राजेंद्र सावंत, ॲड. हरिहर गर्जे, राजेंद्र भंडारी, अभिजीत खंडागळे, अनिल खाटेर, अविनाश मंत्री, संदीप शेवाळे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुटकुळे म्हणाले, पत्रकारांकडून होणारा सन्मान अत्यंत
महत्त्वाचा व प्रोत्साहन देणार आहे. पोलीस दल, प्रशासन, माध्यमे यांची भूमिका समाज हिताची व सुरक्षित संबंधित आहे. परस्पर
संवाद, लोकप्रश्नची जाण
ठेवत संयुक्तपणे केलेले वाटचाल समाजाचे निकोप वाढ होण्यास उपकारक ठरते. तालुक्यातील माध्यमांची भूमिका सकारात्मक व
विधायक असल्याने प्रशासनावर सतत अंकुश राहतो. शहरात व्यापारी, विविध मंडळांच्या
सहकार्याने सीसीटीव्ही कार्यरत असून सुवर्णयुग तरुण मंडळांने बॅरिकेट तयार करून
दिले आहेत. पाथर्डी शहर व तालुक्यातील नागरिक विकास व शांतता प्रिय असून गेल्या
दिवसात सामाजिक गुन्हेगारीला तालुका पोलीस दलाकडून पायबंध बऱ्यापैकी बसला असून अशा
कामासाठी सुद्धा नागरिकांचे सहकार्य लाभत आहे. आगामी दिवाळी सणानिमित्त होणारी
गर्दी लक्षात घेता बाजारपेठेसह महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस ग्रस्त वाढवून रात्रीची
ग्रस्त अधिक वाढवण्यात येणार आहे. महामार्गावर विशेषतः पाथर्डी पासून मीडसांगवी
पर्यंत गावोगावी गस्तकार्य कार्यान्वित होऊन रस्ते अपघात व गुन्हेगारीवर
खबरदारीसाठी विशेष उपक्रम हाती घेतला जाणार आहे. असे मुटकुळे यांनी स्पष्ट केले.
लवकरच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोहटा विश्वस्त मंडळाचा गौरव सोहळा करण्याचे
नियोजन सुरू असल्याचे पत्रकारांनी जाहीर केले. अनिल खाटेर यांनी आभार मानले.
0 Comments