पोलीस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या हाती बंदुका

राजेंद्र जैन / कडा  - पोलीस स्थापना दिनानिमित्त आष्टी पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीरासह सलग सहा दिवस विविध उपक्रम राबविण्यात येत असून, यामध्ये शालेय मुला- मुलींना वाहतुक नियम, ठाण्याचे दैनंदिन कामकाज कशा प्रकारे चालते, पोलिसांकडून हाताळली जाणारी आधुनिक शस्त्र, दारुगोळा या संदर्भात माहिती सांगून पोलीस निरिक्षक संतोष खेतमाळस, सपोनि विजय देशमुख यांनी विद्यार्थीनींना निर्भयतेचे धडे दिले.

आष्टी पोलिस ठाण्यात पोलीस निरिक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थापना दिनानिमित्त मंगळवार दि.२ ते ८ जानेवारी दरम्यान ठाण्यामध्ये रक्तदान शिबीरासह विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  आतापर्यंत या पोलीस ठाण्यात आष्टी, कड्यासह तालुक्यातील आठ ते दहा प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्याची अनोखी सहल अनुभवली. पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज कसे चालते, ठाण्यातील आधुनिक शस्त्र, दारुगोळा व इतर साहित्य दाखवून त्याविषयी माहिती सांगण्यात आली. शालेय मुला- मुलींना रस्ता वाहतुकीचे नियम, महिला सशक्तीकरण, सोशल मिडीया, सायबर गुन्हे तसेच मुलींना संरक्षण, निर्भयतेचे धडे देण्यात आले. शनिवारी आष्टीत पोलीस बँड पथकाची रॅली काढण्यात आली होती. तसेच शाळेत सडकछाप मजनूंकडून त्रास होत असल्यास त्वरित पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक संतोष खेतमाळस यांनी केले. पोलीस स्थापना दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे पोलीस ठाण्याविषयी मुलांच्या मनात असलेली भीती दूर झाल्याची प्रतिक्रिया शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आली. आष्टीच्या पोलीस निरिक्षक खेतमाळस यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या नाविन्यपुर्ण उपक्रमाचे पालकांतून स्वागत होत आहे.

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलीसांचे दैनंदिन कामकाज कशा प्रकारे चालते हे जवळून पाहता यावे. याकरिता हा उपक्रम राबवला, कायद्याचं रक्षण करणे पोलिसांची जबाबदारी असून, पोलीस हा सर्वसामान्यांचा मित्र अन् तुमच्यापैकीच एक माणूस आहे. या भेटी दरम्यान शालेय मुलींना स्वसंरक्षणाच्या दृष्टीने माहिती देण्यात आली. महिला, मुलींना त्रास होत असेल त  पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिसांकडून तात्काळ मदत मिळेल. समाजात कुणीही बेशिस्त वर्तन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे संतोष खेतमाळस, पो.नि. आष्टीअहमदनगर यांनी सांगितले. 

 

Post a Comment

0 Comments