सावित्रीबाई फुले या सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत पेटविणाऱ्या समाजसुधारक – प्राचार्य डॉ जी पी ढाकणे

पाथर्डी - स्रीमनातील काळानुकाल झालेली घुसमट दुर करून त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या आद्य महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन स्री शिक्षणाचा पुरस्कार केला. पती ज्योतिबा फुले यांच्यासोबत ब्रिटीश राजवटीत भारतीय महिलांना हक्क मिळवून देण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली असे प्रतिपादन प्राचार्य डॉ जी पी ढाकणे यांनी केले. ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर डॉ. बबन चौरे, पर्यवेक्षक प्रा. सलीम शेख, प्रा. सुरेखा चेमटे, प्रा. शेखर ससाणे, प्रा. मन्सूर शेख, प्रा. देवेंद्र कराड उपस्थित होते.

  प्रमुख व्याख्यात्या प्रा. सुरेखा चेमटे यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याचा लेखाजोखा विद्यार्थ्यांपुढे मांडला. त्या म्हणाल्या, भारतामध्ये स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा दर्जा दिला जात नव्हता अशा वेळी स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व हे सावित्रीबाईंनी पटवून दिले.  सावित्रीबाईंना शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखले जाते. त्यांनी शिक्षणाचा प्रसार आणि बालविवाह निर्मूलन, तसेच सती प्रथेला विरोध आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांचे जीवन दलित समाजाच्या प्रगतीसाठी तसेच महिलांच्या हक्कांसाठी समर्पित होते. यावेळी महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख डॉ बबन चौरे यांची बेंगलुरू येथील हिंदी राष्ट्रीय परिसंवादासाठी विषयतज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. राणी गिरी, कोमल वायकर, कल्याणी बडे, सुवर्णा रोडे, अक्षय गर्जे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सलीम शेख, सुत्रसंचालन प्रा. देवेंद्र कराड तर आभार प्रा. सुधीर सुडके यांनी मानले. 

Post a Comment

0 Comments