घरातील सगळेजण नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी गेल्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास पाहूण्यासारखा पेहराव करुन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील एक लाख अडतीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, काही नगदी पैसे असा जवळपास दीड लाखाचा ऐवज लुटून पलायन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी भरदुपारी कडा येथील तळेवस्तीवर घडली. त्यामुळे चोरांच्या दहशतीमुळे या वस्तीवरील नागरिक भयभीत झाले आहेत.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कडा येथील तळेवस्तीवर कैलास केरू कर्डीले यांच्या घरातील सगळेजण गुरुवार दि. ११ जानेवारी रोजी नातेवाईकाचा तेराव्याचा कार्यक्रम असल्यामुळे घराला कुलूप लावून गेली होती. याच दरम्यान भरदुपारी एक वाजेच्या सुमारास वस्तीवरील आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येऊ नये, अशा पद्धतीने कडक कपड्यात पाहुण्यासारखा पेहराव करुन विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून अज्ञात तिघेजण आले. एकाने अंगणातील शेळ्यांना पाणी ठेवले. तर दोघाजणांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करुन कपाटात ठेवलेले जवळपास एक लाख अडतीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन गंठण, कानातील झुबे व इतर दागिने, काही नगदी पैसे असा जवळपास दीड लाखाहून ऐवज ऐवज लुटून दुचाकीवरून पलायन केल्याची घटना घडली. या घटनास्थळी बीडच्या फिंगर प्रिन्ट स्काॅडसह श्वान पोलीस पथकाने भेट देऊन हाताचे ठसे घेतले. याबाबत कैलास कर्डीले यांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी अज्ञात चोरट्याविरुध्द कडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि विजय देशमुख, पोउपनि अजीत चाटे, पोना जाधव, मजहर सय्यद, दीपक भोजे, सचिन गायकवाड यांनी भेट देऊन पंचनामा केला. भरदुपारी झालेल्या या घरफोडीमुळे चोरांच्या दहशतीमुळे या वस्तीवरील नागरिक भयभीत झाले आहेत.
0 Comments