पाथर्डी तालुक्यातील शेतीसाठी पाटपाणी ! जलक्रांती अभियानाद्वारे सर्व्हेक्षण

पाथर्डी - तालुक्यातील कायमची दुष्काळी परिस्थिती हटवून शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी कृष्णा खोरे,कुकडी,मुळा,गोदावरी अथवा सद्यस्थितीतील अतिरिक्त पावसाचे वाहून जाणारे नद्यातील पाणी पाट पाण्याद्वारे दोन्ही तालुक्यात आणण्यासाठी जलक्रांती अभियाना अंतर्गत सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आल्याची अभियानाचे संयोजक तथा प्रदूषण नियंत्रक आयुक्त दिलीप जी खेडकर यांनी सांगितले.

शेवगाव पाथर्डी तालुक्यात पारंपारिक दुष्काळ असून भौगोलिक रचनेमुळे अल्प प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे त्यामुळे हंगामी अल्प शेती होत असल्याने शेतकऱ्याचे उदरनिर्वाह त्यावर भागत नसल्याने उदरनिर्वाहाच्या शोधार्थ शेतकरी ऊस तोडणी कामगार अथवा शहरात मजुरीसाठी स्थलांतरित होत आहे या ठिकाणच्या शेतकऱ्याची खडतर परिश्रम करण्याची तयारी असली तरी नैसर्गिक साधन संपत्तीमुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी कृष्णा खोरे मधील कुकडी गोदावरी खोर्यातील अतिरिक्त पाणी आणण्याच्या उद्देशाने दोन्ही तालुक्यातील दुष्काळी गावोगावी जाऊन पुणे येथील प्रोग्रेसिव्ह इंजीनियरिंग यांच्या माध्यमातून समुद्रसपाटीपासूनची उंची तसेच नद्या नाले टेकड्या यांचा सर्वे केला जाणार असून त्यातूनच पुढे शासनाकडे या भागातील शेतीसाठी पाटपाण्याची मागणी केली जाणार आहे. ज्या ठिकाणी नैसर्गिक टेकड्या असतील त्या ठिकाणी सौर ऊर्जेच्या माध्यमातून पाट पाणी लिफ्ट केले जाणार असल्याचे नियोजन आहे.पावसाचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी या भागाला मिळाले तर या भागातील शेती सुजलाम सुफलाम होईल असे यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत दिलीप खेडकर यांनी सांगितले.

योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा तज्ञांकडून व्यवस्थित प्लॅन तयार केला जाईल व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने शासनाकडे या भागातील पाट पाहण्यासाठी मागणी लावून धरली जाईल,गेली पाच ते सात वर्षापासून या भागातील पाणी प्रश्नावर अध्ययन करत असून या भागातील भूमिपुत्र म्हणून मला या भागासाठी सकारात्मक कार्य करण्याची इच्छा आहे.पाथर्डी जलक्रांती अभियानाच्या माध्यमातून हे कार्य सिद्धीस नेले जाईल असेही दिलीप खेडकर यांनी सांगितले.

डोंगर खोदून दुष्काळी भागात पाणी आणता येते आपल्या तालुक्यातील डोंगरातून बोगदे खोडून कुकडीचे पाणी लातूरला जाते तर आपल्याला ते पाणी का मिळू शकणार नाही याचाही आपण विचार केला पाहिजे. आपल्या भागामध्ये डोंगर दर्या जास्त नसल्याने पाट पाणी आणणे अधिक सोपे होणार आहे. कुकडी आणि मुळा प्रकल्पातून या भागातील शेती हरित करण्याची नियोजन पाथर्डी जलक्रांती अभियानाअंतर्गत यापुढे यापुढील कालावधीत राबवली जाईल असेही दिलीप खेडकर यांनी सांगितले.यावेळी माजी सभापती संभाजी पालवे, हभप अजिनाथ महाराज आंधळे,भगवान आव्हाड आदी सह अभियानातील अभियंते व सहकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments