पाथर्डी साईनाथ नगरात सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न ; अज्ञात भामट्यांचा धुडगूस, महिलांमध्ये भीतीचे वातावरण


पाथर्डी | (अधिराज्य) शहरातील साईनाथ नगर परिसरात सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बजाज पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी तोंडाला रुमाल बांधले होते. हे दोघे रस्त्याने चालत जाणाऱ्या स्थानिक महिलांना लक्ष्य करत होते. अचानकपणे त्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर झडप घालत हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलांनी प्रसंगावधान राखत जोरदार आरडाओरडा केला व चोरट्यांना प्रतिकार केला.
महिलांच्या धाडसामुळे चोरट्यांचा डाव पूर्णपणे फसला. या झटापटीत अर्धवट दागिने चोरीला गेले असून मोठी चोरी टळली आहे. आरडाओरड ऐकून नागरिक जमा होताच चोरट्यांनी दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र, उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे साईनाथ नगर व परिसरातील रहिवासी असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाकडे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गांभीर्याने लक्ष घालावे व शहरात सक्रिय असलेल्या सोनसाखळी चोरांचा तातडीने बंदोबस्त करण्याबाबत स्थानिक पोलिसांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.
शहरात वाढणाऱ्या अशा घटनांवर आळा घालण्यासाठी रात्रीची गस्त वाढवणे, संशयित दुचाकींवर नजर ठेवणे तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments