मंगरूळ ग्रामस्थांची भगवानगडासाठी ५१ लाखांची देणगी; मंदिर उभारणीसाठी सहकार्याचे आवाहन

 


भगवानगड (प्रतिनिधी): श्री क्षेत्र भगवानगड येथे उभारण्यात येणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर प्रकल्पासाठी राज्यभरातून देणग्यांचा ओघ सुरू असून, शेवगाव तालुक्यातील मंगरूळ गावाने तब्बल ५१ लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे.

गडाचे मठाधिपती डॉ. श्री नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर उभारणीचे काम सुरू असून, विविध गावांतील भक्तगण पुढाकार घेत देणग्या देत आहेत. अनेक गावांप्रमाणेच मंगरूळ ग्रामस्थांनीही एकत्र येत देणगीची घोषणा केली. त्यानुसार सर्व ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या देणग्यांची एकूण रक्कम ५१ लाख रुपये इतकी झाली आहे.

यावेळी गावातील काही नागरिक नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्या देणग्या अद्याप जाहीर व्हायच्या आहेत. त्यामुळे या देणगीच्या रकमेतील वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांच्या विनंतीनुसार भगवानगडाचे उत्तराधिकारी मंगरूळ येथे आले असता, गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात देणगी जाहीर केली. पुढील काळात निश्चित तारखेला सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ही देणगी प्रत्यक्ष मठाधिपतींकडे सुपूर्द करणार आहेत.

दरम्यान, कोट्यवधी रुपये खर्चाच्या या भव्य मंदिर उभारणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तवर्ग मोठ्या प्रमाणावर पुढे येत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर “शिवधनुष्य पेलण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे” असे आवाहन भगवानगड ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments