पाथर्डी - बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी वाचनाचे महत्व
अनन्यसाधारण असून स्वातंत्र्य,
समता आणि बंधुता ही त्रिसूत्री केवळ
कागदावर न राहता ती कृतीतून प्रत्ययास आणण्याचे कार्य वाचनाच्या रुपाने होऊ शकते.
आपल्या संस्कृतीत पूर्वीपासूनच ज्ञानाला महत्व असून आजची पिढी सुसंस्कृत
होण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचाल तर वाचाल असं आपण नेहमीच म्हणतो, पण त्या बोलण्याला खर्या अर्थाने अर्थ प्राप्त होण्यासाठी निरंतर
वाचनाला प्रेरणा मिळावी हीच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली ठरेल असे
प्रतिपादन येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी पी ढाकणे यांनी
केले.
वाचनकट्टा व ग्रंथालय विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या वाचन
प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ढाकणे बोलत होते. यावेळी
व्यासपीठावर ग्रंथपाल प्रा. किरण गुलदगड, वाचनकट्टा समन्वयक डॉ. वैशाली आहेर, डॉ सुभाष शेकडे,
डॉ बबन चौरे, डॉ. अशोक डोळस,
डॉ अशोक कानडे, डॉ. अर्जुन केरकळ आदी उपस्थित होते.
डॉ ढाकणे पुढे म्हणाले, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.
जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा होतो. अब्दुल कलामांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत
शिक्षण घेऊन स्वत:ला घडविले. देशाच्या संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात त्यांनी केलेले
भरीव कार्य सदैव स्मरणात राहील. अभ्यास आणि दर्जेदार वाचनाने माणूस
राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचू शकतो याचा वस्तूपाठ म्हणजे अब्दुल कलाम. माणसाला असणारे
ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या सहाय्याने त्याला सृजनशीलतेची
वाट सापडते. सहृदयता, दुसर्याआच्या दु:खाची जाणीव, त्यास आवश्यक असणारे संवेदनशील मन याचबरोबर सामाजिक जाणीव दृढ
होते. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे
याचे भान प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही असे ते शेवटी म्हणाले. डॉ सुभाष शेकडे व
डॉ बबन चौरे यांनीही आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून
दिले. सिद्धांत शिरवाळे, सानिका फुंदे, ज्ञानेश्वरी शेटे,
प्रांजल बोरुडे या विद्यार्थ्यांनी
पुस्तक वाचनानंतर आलेले अनुभव कथन केले.
यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचनकट्टा व ग्रंथालय
विभागामार्फत पोस्टर प्रदर्शन व निरंतर वाचन उपक्रम राबविण्यात आला. या
उपक्रमांतर्गत विद्यर्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकांचे परीक्षण पोस्टररुपात सादर
केले तसेच दिवसभर मोबाईलचा कुठलाही वापर न विविध साहित्यकृती वाचनाचा आनंद घेतला.कार्याक्रमाचे
प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ वैशाली आहेर तर आभार प्रा. किरण गुलदगड यांनी मानले.कनिष्ठ
महाविद्यालायानेही वाचन प्रेरणा दिन साजरा केला यामध्ये पर्यवेक्षक प्रा. शेखर
ससाणे, प्रा. मन्सूर शेख व प्रा देवेंद्र
कराड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वाचन उपक्रम राबविला.
0 Comments