खा.विखेंचे हेलिकॉप्टर आव्हाडांच्या हेलिपॅडवर


पाथर्डी – (हरिहर गर्जे ) महामार्गावरील खड्डे टाळण्यासाठी आ.मोनिका राजळे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला खा.सुजय विखेंचे हेलिकॉप्टर कासार पिंपळगाव येथील हेलिपॅड ओलांडून पाथर्डी येथील अभय आव्हाडांच्या हेलिपॅडवर उतरल्याने येवू घातलेल्या पालिका,पंचायत समिती,जिल्हापरिषद निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय झाला असून या हवाई प्रवासा मुळे मात्र रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींची डोळेझाक होत असल्याचा आरोप सामाजिक क्षेत्रातून होत आहे.   

रखडलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ “ कल्याण  निर्मळ नांदेड महामार्गा “ चे रडगाणे सर्वश्रुत आहे. या महामार्गावरील अहमदनगर ते फुंदे टाकळी दरम्यान प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रासाचा सामना करावा लागत आहे.यास वाचा फुटावी रखडलेले काम मार्गी लागावे याबाबत आज अखेर पाथर्डी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली असून रखडलेले काम मार्गी लावावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली असून त्यावर अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू आहे.गेल्या महिन्यात पाथर्डी मधून सर्वपक्षीय तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी रखडलेला महामार्ग पूर्वपदावर येत नाही याचे निषेधार्थ राष्ट्रीय महामार्ग विभागाचा दशक्रिया विधी आंदोलन केले होते,या आंदोलनास पाथर्डी करांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. याबाबत विद्यमान लोकप्रतिनिधी बाबत आरोप प्रत्यारोपांच्या फेरी घडल्या होत्या मात्र त्यानंतरही या कामास कुठलीही सबळ प्रगती दिसून आली नाही.

अतिवृष्टी नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्या दरम्यान शेवगाव येथे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे यांचा दौरा झाला या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडी तसेच सामाजिक संघटनांनी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तसेच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न या मुद्द्यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला, मात्र या सर्व आंदोलनाची कल्पना मंत्री महोदयांना आधीच होती कि असल्याने तसेच रस्त्यावरील खड्ड्यांची चाळण व त्यावरून मंत्रिमहोदयाचा आदळत आपटत होणारा दौरा जिकिरीचा असल्याने मंत्री महोदयांनी थेट हेलिकॉप्टरने या भागात दौरा केल्याची सर्वांनी पाहिले व अनुभवले आहे. या दौऱ्यापासून या भागाच्या आमदार मोनिका राजळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन हात दूरचे अंतर बाळगल्याचे पहावयास मिळाले त्यावर मोठ्या प्रमाणावर तर्कवितर्क व चर्चा देखील ऐकायला मिळाल्या.


दिवाळीनंतर रविवारी आमदार मोनिका राजळे यांनी त्यांच्या कासार पिंपळगाव येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात दिवाळी फराळ कार्यक्रम व स्नेही जणांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यास भाजपा पक्षाचे पदाधिकारी तसेच राजळे कुटुंबीयांशी स्नेह असलेले सर्व क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला मात्र आवर्जून दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील हे जातीने प्रमुख कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. विखे पाटील यांची हेलिकॉप्टर प्रवासाने अलिशान उपस्थिती येत्या पंचायत समिती,जिल्हा परिषद व पालिका निवडणुकीच्या तोंडावर चर्चेचा विषय ठरली ती त्यांच्या या कार्यक्रमाला येताना केलेल्या हेलिकॉप्टर प्रवासामुळे. आ.राजळे यांनी आयोजित केलेला दिवाळी फराळ कार्यक्रम वृद्धेश्वर सहकारी कारखाना परिसरातील महाविद्यालयाच्या प्रांगणात होता त्या ठिकाणी पूर्वी पासून सुसज्ज असे हेलिपॅड बनवण्यात आलेले  आहे. यापूर्वी अनेक कार्यक्रमाला मंत्री महोदयांच्या हेलिकॉप्टरचे आगमन या ठिकाणी झालेले आहे, मात्र अशी परिस्थिती असताना खासदार सुजय विखे यांनी मात्र आपले हेलिकॉप्टरचा मोर्चा पाथर्डी शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या हेलीपॅड वर वळवला व त्या ठिकाणाहून मोटारीने ते आ.राजळे यांच्या कार्यक्रमाला गेले.मग त्यांनी कारखान्या वरील हेलिपॅड का वापरले नाही. याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असून येत्या पालिका निवडणुकीच्या तोंडावर विखेंचे हेलिकॉप्टर आव्हाडांच्या हेलिपॅड वर उतरून आमदार राजळे यांच्या गोटात जाऊन कोणती राजकीय खेळी करणार याबाबत येणारा काळच काय ते सांगेल !


याशिवाय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ निर्मळ नांदेड महामार्गाची अक्षरशः खड्ड्यांनी चाळण झाली असून यावरून चार चाकी वाहने जाणे खूप जिकरीचे झाले आहे म्हणून खड्ड्यांचा त्रास चुकवण्यासाठी खासदार विखे मतदार संघात थेट हेलिकॉप्टरने इच्छित ठिकाणी ये जा करतात याचा अर्थ त्यांच्याकडून मतदार संघातील रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हेतू आहे का ? की ते जाणीवपूर्वक या भागातील या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या नागरिक व आंदोलकांना खिजवत आहेत का ? की ते आपल्या कुबेर संपत्तीचं व वैभवाचे प्रदर्शन करत आहेत ? हे प्रश्न देखील या निमित्ताने नगर दक्षिण मतदारांच्या मनात उपस्थित होत आहेत.मात्र या सर्व राजकीय आडाखे व डावपेचात गेल्या सात वर्षापासून रखडलेला राष्ट्रीय महामार्ग मात्र पाथर्डी करांचे दररोज नवीन अपघात,त्यात जाणारे  बळी व अपघातातून येणारे अपंगत्व अनुभवत आहे.

Post a Comment

0 Comments