पाथर्डी शहरातील सुवर्णयुग तरुण मंडळाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या गणेशोत्सवा मध्ये उत्कृष्ठ कार्य केल्या बद्दल राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला असून शासनाकडून मंडळाला रोख अडीच लाख रुपये व प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण होणार आहे.
राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये पाथर्डी शहरातील सुवर्णयुग तरुण मंडळाने गणपती उत्सव दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवित स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये मंडळाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक घोषीत झाले आहे.मंडळाकडून वर्षभर देखील विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याची सुध्दा दखल घेण्यात आली आहे. सुवर्णयुग मंडळाचे कोरोना काळातही सामाजिक उपक्रम राबवत गोरगरीब जनतेला किराणा वाटप, परप्रांतीय मजुरांना मदत यासह प्रशासनाला मोठी मदत केली होती. मंडळाने अनेक वर्षे अतिशय परिश्रम पुर्वक राबवलेल्या निसर्ग संवर्धन, वृक्ष लागवड व संगोपन यामध्ये ही मोठे कार्य केले आहे. प्रशासनाने गणेशोत्सवासाठी घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वानुसार गणेशोत्सव साजरा करत शासनाने सांगितलेल्या सर्व निकषांमध्ये नियमांची अंमलबजावणी करत विविध उपक्रम राबविले.पु. ल.देशपांडे कला अकादमी यांच्या वतीने पारितोषिक वितरण येत्या १८ तारखेला मुंबई येथे रवींद्र नाट्य गृह येथे सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ईतर मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते होत आहे.त्यासाठी मंडळाला रीतसर शासनाकडून निमंत्रण दिले गेले आहे.आमदार मोनिका राजळे, अँड प्रताप ढाकणे, प्रभावती ढाकणे, अभय आव्हाड, डॉ मृत्युंजय गर्जे,गोकुळ दौंड, प्रांताधिकारी देवदत्त केकाण,तहसीलदार शाम वाडकर, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, गट विकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी स्वर्णोत्तरमंडळावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
0 Comments