करंजी - शेतकऱ्यांच्या व विज ग्राहकांच्या थकीत विज बिलासंदर्भात कडक कारवाई करणाऱ्या महावितरणला मात्र स्वतःच्या कडील असणाऱ्या थकबाकीबद्दल मात्र काहीच वाटत नसुन महावितरणकडे थकबाकी असलेल्या भोसे ग्रामपंचायतीने आता महावितरणविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
शेतकऱ्यांकडे तसेच विज ग्राहकाकडे विजेची थकबाकी असली तर त्या ग्राहकावर महावितरणकडून कडक कारवाई करुन त्यांचा विज पुरवठा तोडला जातो. ग्राहकांवर अशी कारवाई करणाऱ्या महावितरणला मात्र त्यांच्याकडील थकबाकीची आठवण होत नसल्याची तक्रार भोसे ग्रामस्थांनी केली आहे. पाथर्डी तालुक्यातील भोसे ग्रामपंचायत हद्दीत महावितरणचे सबस्टेशन आहे.
एक वर्षासाठी १ लाख २६ हजार ९५८ एवढा ग्रामपंचायतीचा कर भरण्याचे ठरले होते. मात्र गेल्या ५ वर्षापासून महावितरणने एकही पैसा कर भरला नाही. भोसे ग्रामपंचायतीची ६ लाख ३४ हजार ७९० रुपये थकबाकी मिळावी म्हणुन ग्रामपंचायतने महावितरणला ४ नोटीसा पाठवुन संबंधित थकबाकी भरण्याची विनंती करुनही कोणतीच दखल महावितरणने घेतली नाही. महावितरणचे हे सबस्टेशन गेल्या ६ वर्षापासुन भोसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत कार्यरत आहे. येत्या महिन्याभरात महावितरणने भोसे ग्रामपंचायतीची थकबाकी भरली नाही तर आपण भोसे ग्रामस्थासह महावितरणच्या सबस्टेशनसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा सरपंच विलास टेमकर, उपसरपंच संदिप साळवे, अशोक टेमकरसह अनेक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी भोसे ग्रामपंचायत चे सरपंच विलास टेमकर यांनी सांगतले कि,गेल्या ६ वर्षापासुन महावितरणचे सबस्टेशन भोसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. गेल्या ५ वर्षापासुन महावितरणकडे ग्रामपंचायतीची ६ लाखाच्यावर थकबाकी आहे. नोटीसा पाठवुन याची साधी दखलही घेत नसल्यामुळे आपण उपोषण करणार आहोत.
0 Comments