शेवगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला

शेवगाव : निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नगर जिल्ह्यातील २०३ तर, शेवगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीचा त्यामध्ये समावेश आहे.२८ नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. १८ डिसेंबरला मतदान तर, २०डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या व चुरशीने होणार आहेत. ऐन थंडीच्या मोसमात या निवडणुका जाहीर झाल्याने सर्वच ग्रामपंचायतीमध्ये वातावरण तापणार असून राष्ट्रवादी - भाजपा असाच सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

शेवगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात रावतळे कुरुडगाव, खामगाव, वाघोली, अमरापूर, दहिगाव- ने, जोहरापूर,रांजणी, प्रभू वाडगाव, आखेगाव, खानापूर भायगाव, सुलतानपूर खुर्द या १२ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका व त्या पाठोपाठ २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार, हे स्पष्ट आहे.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने गावोगावच्या पारावरच्या गप्पांत रंग भरू लागला आहे. गावचा भावी कारभारी कोण ? याबाबत चाचपणी सुरू झाली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीने राजकीय धुळवड उडू लागली असून उंबरठ्यावर पालिका निवडणूक येवून ठेपली असल्याने गल्लोगल्ली युवानेते गुडघ्याला नगरसेवक पदाचे बाशिंग बांधून तयार आहेत त्यामुळे येत्या कालावधीत येणाऱ्या निवडणुका चुरशीच्या असणार आहेत.

Post a Comment

0 Comments