परिसराची शान,शून्यातून केले विश्व निर्माण

पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगराच्या कुशीत वसलेल्या व नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमित अनेक लहान-मोठी गावे वसलेली आहेत. हा भाग दुष्काळी म्हणून ओळखला जात असला तरी या गावांनी अनेक संत-महात्म्ये तसेच इतर अनेक क्षेत्रात नाव कमावणाऱ्या व्यक्तीस जन्माला घातले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या भागातील व्यक्तींनी जिल्ह्यात नव्हे तर राज्यभर या परिसराचे नाव आपल्या आवाजाच्या अनोख्या अंदाजातून पोहचविण्याचा प्रयत्न केला. पाथर्डी तालुक्यातील चारशे ते पाचशे लोकवस्ती असलेल्या धारवाडी गावात अतिशय गरीब व भटक्या समाजात जन्माला आलेल्या उध्दव काळापहाड या तरुणाने आपल्या जादुई आवाजाने जिल्ह्याला नव्हे तर राज्याला भुरळ घातली.

आज्जी, आजोबांचा म्हशी पाळण्याचा व्यवसाय होता. त्या निमित्ताने ते सतत भटकंती करीत असत. वडील माजी सैनिक, कडक शिस्तीचे होते. पारंपारिक व्यवसायात उध्दवचे मन लागले नाही. डि.एड. चे शिक्षण पुर्ण केले. याच काळात शाळा, काॅलेजमधील घोषणा, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. त्यांचा आवाज, बोलण्याची लकब पाहुन त्याला एका शिक्षकाने मार्गदर्शन करुन घडविले. आज जिल्ह्यात कोणताही राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, प्रचार, सभा असा कोणताही कार्यक्रम असो हा आवाज लोकांच्या कानावर पडल्याशिवाय कार्यक्रम झाला असे वाटतच नाही.इतकी भुरळ काळापहाड यांच्या आवाजाने लोकांना घातली आहे. पाठीशी कोणतेही पाठबळ नाही, गॉडफादर नसताना कठोर मेहनत व परिश्रमाच्या बळावर आज त्यांचा प्रसिध्द आर्कट्रा आहे. त्यांचा "होम मिनिस्टर " पैठणीचा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजला. एवढा व्यस्त कार्यक्रम असुनही गावाला आणि परिसराला उध्दव कधी विसरला नाही. त्यांनी धारवाडी गावाचे उपसरपंचपदही भूषविले. आजही ते ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. मि कोणत्याही कार्यक्रमाला गेलो तर लांबूनच उध्दवचा पहाडी आवाज कानावर पडताच मला वाटते "परिसराची शान, शुन्यातुन केले विश्व निर्माण"


Post a Comment

0 Comments