पाथर्डी - बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.योगिता खेडकर हिने मोदीनगर, गाजियाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय रँकिंग महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत ८७ किलो ज्युनियर वजन गटात १८३ किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले आहे.
योगिताने मागील वर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने केलेला १७४ किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडला. नुकतीच तिची स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया, बेंगलोर या ठिकाणी प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. कु. कोमल वाकळे हिने ८७ किलो सिनियर वजन गटात २११ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तिने गुजरात येथे झालेल्या नॅशनल गेम्स वेटलिफ्टिंग स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले होते. कोमल बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून ती बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या वेटलिफ्टिंग सेंटरमध्ये सराव करते. या दोघींना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व अहमदनगर डिस्ट्रिक्ट वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव प्रा. विजय देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. पी. ढाकणे अहमदनगर डिस्ट्रिक्ट वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी अभिनंदन केले. या दोघींवर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
0 Comments