बँकिंग क्षेत्रात टॅली कोर्सला महत्व – राजेश परदेशी

पाथर्डी- भारतीय बँकिंग क्षेत्रात कोरोनानंतर अमुलाग्र बदल होत असून जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्रातील मुलेही बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात येत आहेत. इतकेच नव्हे तर अमेरिकेसारख्या प्रगतशील देशात नोकरी करत असलेले भारतीय तरुण बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी शोधत आहेत. सध्या डिजीटल युग आकारास येत असून यामधून बँकाही सुटलेल्या नाहीत. मागील दोन वर्षात डिजीटल प्रक्रियेचा वापर या क्षेत्र झपाट्याने वाढत असून त्यासाठीच टॅली सारख्या कोर्सेसला बँक व्यवसायात अनन्यसाधारण महत्व आहे असे प्रतिपादन पाथर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक राजेश परदेशी यांनी केले.

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात टॅली कोर्स प्रमाणपत्र वितरण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ जी. पी. ढाकणे, डॉ. बबन चौरे, डॉ. सुभाष शेकडे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. प्रशांत साळवे, डॉ अशोक कानडे, डॉ भगवान सांगळे आदी उपस्थित होते.राजेश परदेशी यांनी यावेळी डिजीटल क्रांतीमुळे झालेल्या फायद्यांबरोबरच त्यामुळे होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांबाद्दलाही विद्यार्थ्यांना अवगत केले. सायबर फ्रॉड मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यापासून वेळीच सावध झाल्यास आर्थिक नुकसान होत नाही व त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर समाजालाही याविषयी माहिती द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अभय आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना नकारात्मक विचार न करता व सोशल मिडियाचा वापर कमी करून सर्व लक्ष आपल्या करियरकडे दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही बँकींग क्षेत्रात उच्च पदावर पोहचू शकतात फक्त त्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवणे आवश्यक आहे हा सल्ला दिला.यावेळी १८ टॅली कोर्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. वैष्णवी चव्हाण, राजनंदिनी सूरवसे, श्रीविद्या शिंदे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, सुत्रसंचालन प्रा. विजयकुमार म्हस्के व डॉ प्रशांत साळवे तर आभार डॉ भगवान सांगळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments