ओवी ज्ञानेशाची एक अमृतानुभवी स्पर्धा !

बीड - (बाळासाहेब बोडखे) - संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ का लिहीला असावा ? ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहीण्यामागचा पुर्वपक्ष काय होता ? ज्ञानेश्वरांना गितेचे ज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातुन मराठी भाषेत सांगावेसे का वाटले असावे ? ज्ञानेश्वरी ग्रंथ कुणी वाचावा ? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणासाठी आणि कशासाठी लिहीला ? ज्ञानेश्वरी ग्रंथ मानवी जीवनाच्या कोणत्या वेळी वाचण्यास सुरूवात करावी ? ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठांतर केल्याने ज्ञानेश्वरी समजेल कि ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्याने समजेल ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ज्यावेळी मनात येतात त्यावेळी ते शोधण्याची उत्सुकता निर्माण होते. त्यादृष्टीने थोडी चर्चा.

ज्ञानेश्वरांची गुरूपरंपरा होती. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव अशी ही गुरूपरंपरा होती. निवृत्तीनाथापर्यंत गुरूकडुन फक्त शिष्याला ज्ञान देण्याचा प्रघात होता. त्यापुर्वी सामान्य माणसाला ज्ञान दिले जात नव्हते. किंबहुना ते मिळुच शकत नव्हते. एकतर गीता संस्कृत भाषेत. शिक्षणाचा अभाव. गुरू शिष्य परंपरा असल्यामुळे सामान्य माणसाला गीतेचे ज्ञान सहज उपलब्ध नव्हते. 


जीवन जगण्याचा मार्गदर्शक ग्रंथ म्हणजे गीता आहे. परंतु, प्रश्न असा आहे की, गीतेचे ज्ञान मिळविणे आवश्यक का आहे. रोजच्या जीवनात गीतेतील ज्ञान उपयोगाचे आहे का ? फक्त गीतेचा अभ्यास केला म्हणजे आपली उपजिवीका भागेल का ? असा प्रश्न माणसाला निश्चितच पडेल. 

आज महाराष्ट्र् संत साहित्यामुळे धार्मिक बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्र् आहे. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा, संत कबीर, संत जनाबाई, संत निळोबा यासारख्या असंख्य संताच्या जन्मानंतर आपला जन्म झाला आणि त्यांचे अभंगरूपी संत साहित्य आपल्याला वाचण्यासाठी आणि अभ्यासासाठी आयते उपलब्ध आहे. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. ज्यावेळी क्रांती किंवा उत्क्रांती घडत असते त्यावेळी त्यावेळच्या लोकांना त्याचे महत्व वाटत नाही किंवा त्याचा लाभही मिळत नाही, किंवा लाभ घेता येत नाही. परंतु, त्यानंतरच्यांना माञ त्याचा लाभ घेण्यासाठी उपलब्धता असते.

धनदौलत, पत्नी, मुले, मिञ, सगेसोयरे सर्व अनुकूल असते, तरीही मनुष्य जीवन जगतांना कधीतरी चिंतेने डळमळीत होतो. त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. ज्याच्याकडुन उत्तर मिळते तो विश्वासर्य नसतो. त्यावेळी आपण मनातुन डळमळीत झाल्यासारखे होते. त्यावेळी आपल्याला विश्वासार्य उत्तर आणि विश्वासार्य उत्तर देणारा आवश्यक असतो. त्यावेळी जीवनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ज्ञानेश्वरी मदत करते. 

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आळंदीत असतांना लिहीली नाही. पैठणच्या ब्राम्हणांनी त्यांना शुध्द करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर रेडयामुखी वेद बोलविला. त्यानंतर माउली परत जात असतांना नेवासा या ठिकाणी माउलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहीला. त्यामागे कारण काय असावे याचा शोध घ्यायला पाहीजे. रेडयामुखी वेद बोलविला या चमत्कारानंतर माउलींनी ठरविले असते तर मोठे महाराज, गडकरी, महंत, मठाधिपती झाले असते. लाखो शिष्य जोडले असते. जीवन सुखात घालू शकले असते. परंतु, माउलींनी असे काहीच केले नाही. 

संत ज्ञानेश्वरांचे आजोबा श्रीधरपंत हे देवगिरीच्या राजाकडे सरदार होते. त्यांच्याकडे आताच्या मराठवाडा प्रातांचा कारभार होता. श्रीधरपंताची आजही बीड शहरात समाधी आहे. विठ़ठलपंत हे अशा सरदाराचे चिरंजीव होते. याचा अर्थ ते गरीब होते असा होवू शकत नाही. सर्वसधनता असणा-या कुटूंबातील आणि सवर्ण जातीतील असतांनाही धर्माचा तथाकथीत धर्माच्या ठेकेदारांनी चुकीचा अर्थ लावला. त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांची हत्या झाली. आजच्या भारतीय दंड सहिते प्रमाणे हा फौजदारी गुन्हा आहे. तुमच्या मुलांना शुध्द करावयाचे असल्यास आईवडिलांना मृत्यूदंडाची शिक्षा देणे ही थंड मेंदुने केलेली क्रुर हत्याच आहे. माउली समाजातील सवर्ण जात असणा-या ब्राम्हण कुळातील होते. तरीही धर्माचा चुकीचा अर्थ लावून माझेसारख्याचे आईवडिल मुलांना शुध्द करण्यासाठी मारले जात असतील तर सामान्यांची अवस्था काय असेल हे माउलींना जाणवले असणार. धार्मिक बाबतीत सवर्ण ब्राम्हण जातीत जन्म असतांना एवढया हाल अपेष्टा होत असतील तर इतरांची स्थिती काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी. ज्ञानेश्वरी ग्रंथामधुन गीतेतील धर्माचा खरा अर्थ आणि खरा देव काय आहे हे तमाम लोकांना समजावे म्हणुन प्रस्थापित धर्मांध शक्तीविरूध्द संत ज्ञानेश्वरांनी केलेला विद्रोह आणि संघर्ष म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. 

जीवनाची सुरूवात करतांना तरूणांनी वाचण्याचा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. परंतु, आपल्याकडे वृध्दापकाळात पारायणे करून ज्ञानेश्वरी समजुन घेण्याचा प्रयत्न केला जातो. तो करण्याबाबत आक्षेपही नाही. परंतु, वृध्दापकाळात ज्ञानेश्वरीतील विज्ञान, कर्मयोग, व इतर बाबी समजणे म्हणजे बैल गेला अन झोपा केला असे आहे.

महाभारत, रामायण, उपनिषदे, पुराणे यामध्ये विशिष्ट अशी कथा आहे. परंतु, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कथा नाही. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तरूणांना जीवन जगतांना पदोपदी मार्गदर्शन करणारा आहे. गीता ज्या ठिकाणी सांगीतली ते ठिकाण म्हणजे युध्दाचे रणांगण आहे. त्याठिकाणी कृष्ण -अर्जुनाच्या संवादातुन गीता ज्ञान कृष्णाने जगाला सांगीतले आहे. परंतु, ते संस्कृत भाषेत बंदिस्त होते. धर्माचा प्रमुख व्यक्ती ज्याला धर्म म्हणेल तोच धर्म मानला जात होता कारण इतर अज्ञानात होते. केवळ अज्ञानामुळे सामान्य माणुस भरडला जात होता. जीवन बरबाद होत होते. त्यामुळे ज्ञानेश्वरी लिहीली असावी या म्हणण्याला पुष्ठी मिळते. 

बुडते हे जन न देखवे डोळा, याप्रमाणे माउलींनी तमाम विश्वजनासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथातुन सर्व प्रकारच्या ज्ञानाची सत्यता ठामपणे प्रतिपादन केली. कसलाही संशय नाही. आजपर्यंत ज्ञानेश्वरीला छेद देणारे साहित्य उपलब्ध नाही. 

ज्ञानेश्वरीतील प्रतिपादय गोष्ट समजुन सांगण्यासाठी माउलींनी दृष्टांत म्हणजे उदाहरणाचा आधार घेतला. एका बाबीसाठी अनेक दृष्टांत दिले. या दृष्टांतामधुन ज्ञानेश्वरांनी खगोलशास्ञ, रसायनशास्ञ, भौतिकशास्ञ, जीवशास्ञ, औषधशास्ञ, पर्यावरण, भुगोल, कृषि शास्ञ, मानसशास्ञ, व्यवहारज्ञान, व्यवहारचातुर्य, व्यापार अशा विविध विषयांचे ज्ञान सांगणारी उदाहरणे / दृष्टांत दिले. याच ज्ञानेश्वरीचा पाश्चिमात्यांनी भारतात येवून अभ्यास केला. त्यावर संशोधन केले व त्याचे पेटंट घेवून तो शोध त्यांनी लावला असे आपण म्हणतो. त्यानंतर काही वर्षांनी भारतात विशेषकरून महाराष्ट्रात आवाज येतो की, हे तर आमच्या ज्ञानेश्वरीत 12 व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी लिहीलेले आहे. या ठिकाणी माझा प्रश्न आहे की, जर हे ज्ञान ज्ञानेश्वरीत 12 व्या शतकात होते, तत्पुर्वी देखील अनेक ऋषिमुनींच्या ग्रंथात होते तर मग आपण ते आधी का नाही अभ्यासले, दुस-याने जाहीर केल्यावर ओरड करण्यात काय शहाणपणा. ज्ञानेश्वरी जर सर्व प्रश्नाचे उत्तर देवू शकते. जीवनातील प्रत्येक अडचण सोडवू शकते तर ती आपण अभ्यासत का नाही. पारायण करून सात दिवसात उजळणी होवू शकते परंतु, अभ्यास नाही. ज्ञानेश्वरी फक्त पारायणापुरती सात दिवसात वाचल्याने किती पारायणे झाल्यावर आपल्याला ज्ञानेश्वरीतील ज्ञान समजेल ? किर्तनकाराने, प्रवचनकाराने एखादया ओवीवर बोलणे हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास होवू शकत नाही. सगळयात महत्वाचे ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहीणा-या संत ज्ञानेश्वर माउलींचा ग्रंथ लिहीण्यामागे असा उद़देश मुळीच असु शकत नाही. ज्ञानेश्वरीचा शास्ञ म्हणुन अभ्यास न करून आपणच आपल्याला फसवित आहोत. किर्तन छान झाले, प्रवचन छान झाले, छान ओवी सोडविली, छान अभंग सोडविला, माउलींचे ज्ञान अगाध आहे, तो महासागर आहे. आपल्याला कधी जमणार या विचाररूपी अजानवृक्षाच्या मुळयांचा वेढा माउलींच्या गळयाला पडलाय. तो ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाने सोडविला पाहीजे. 

कोणताही ग्रंथ, पुस्तक लिहीणा-या लेखकाचा त्यामागे काहीतरी हेतु असतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहीण्यामागे ज्ञानेश्वरी ग्रंथ फक्त पठण करावा, त्याची पुजा व्हावी, असा माउलींचा उद़देश मुळीच असु शकत नाही. ज्ञानेश्वरांना त्यांनी लिहीलेल्या ग्रंथाचा एवढा लाड करवून घ्यायचा असता तर त्यांनी तसे कुठेतरी लिहीले असते. तो लाड बघण्यासाठी ते संपूर्ण आयुष्य जगले असते. 21 व्या वर्षी संजिवन समाधी घेतली नसती. ज्ञानेश्वरी लिहीण्यामागे हेतु हाच की, गीतेतील ज्ञानाअभावी विश्वातील सामान्य माणुस जो अंधारात गुरफटला गेला आहे. त्याला सोडविण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहीली आहे. त्यामुळे ती जीवनाची सुरूवात करतांना अभ्यासली पाहीजे.

लेखक (ॲङ बाळासाहेब बोडखेमो.नं.9423471312

ज्ञानेश्वरी महासागर आहे. ते आपल्याला जमणार नाही. अशा सबबी सांगुन बरेच जण जबाबदारी टाळतात. परंतु, हे चुकीचे आहे कारण ज्ञानेश्वरी ज्या नेवाशात सांगीतली ज्यांच्यासमोर सांगीतली तो सामान्य माणुसच होता. ज्ञानेश्वरी ही सामान्य माणसाला श्रोता समजुन लिहीलेली आहे. त्यामुळे त्यासाठी फार मोठा पंडितच पाहिजे असे नाही. 

ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातुन ओवी ज्ञानेशाची मंडळ खिळद ज्ञानेश्वरीतील तीन वैज्ञानिक ओवी विश्लेषण लिहुन देण्याची स्पर्धा राबवीत आहे. मागील दोन वर्ष आणि या वर्षीदेखील स्पर्धेकांचा वयोगट पाहिला तर तो तरूणच आहे. त्यांचे लिखाण पाहीले तर हेवा वाटावा असे लिखाण आहे. या तीन वर्षात जवळपास 100 वैज्ञानिक ओव्यांचा संग्रह या ओवी ज्ञानेशाची स्पर्धेच्या माध्यमातुन आयोजकांकडे जमा झालेला आहे. तो एक अमुल्य ठेवा आहे. यात सर्वात जमेची बाजु ही आहे की, तरूण ज्ञानेश्वरी अभ्यासायला लागला आहे. या स्पर्धेत वयाची अट नाही. जे ज्ञानेश्वर माउलींपेक्षा लहान आहेत ते सर्वजण यात सहभागी होवू शकतात. आतापर्यंत आलेल्या ओव्यामध्ये आलेले विज्ञान पाश्चिमात्य शास्ञज्ञांनी त्यांच्या नांवे खपविले, त्याचे कारण आपण आपल्या जवळ असतांना अभ्यासले नाही. फक्त भगव्या वस्ञात पुजेचा ग्रंथ म्हणुन जपुन ठेवला. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातुन ज्ञानेश्वरीचा वैज्ञानीक दृष्टीकोनातुन अभ्यास व्हावा यासाठी ओवी ज्ञानेशाची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातुन ज्ञानेश्वरीचा वैज्ञानिक अंगाने अभ्यास होईल आणि त्याचा फायदा संत ज्ञानेश्वरांच्या विश्वात्मक देवाला म्हणजे अखंड विश्वातील जडजीवांना होईल यासाठी या स्पर्धेचा अट़टाहास अशी स्पर्धो आयोजित करण्यामागे शेकडो हात कार्यरत आहेत. मार्गदर्शक ह.भ.प. श्री. सुदर्शनजी महाराज सांगवीकर, स्पर्धेचे तीन वर्षापासुन परिक्षक म्हणुन काम पाहणारे ज्ञानेश्वरी अभ्यासक आणि भौतिकशास्ञातील पि.एच.डी. पदवी प्राप्त प्रा.डॉ. सोपानराव निंबोरे, स्पर्धेचे संपूर्ण प्रसिध्दी, नियोजन पाहणारे ह.भ.प. वागभुषण श्री. देविदास महाराज खिळदकर, पांडुरंग गर्जे, व खिळद येथील सर्व ज्ञानेश्वरी प्रेमी आणि ओवी ज्ञानेशाची मंडळ यांच्या सहकार्याने ही स्पर्धा तिस-या वर्षी संपन्न झाली. जीवनात कधी आत्मविश्वास डळमळीत झाल्याची शंका जरी मनात आली तरी पुढील कोणताही निर्णय घेण्याआधी एकदा ज्ञानेश्वरी वाचा, अभ्यासा, उत्तर निश्चित सापडेल हा ठाम विश्वास आहे. तो विश्वास चेतविण्यासाठी ओवी ज्ञानेशाची स्पर्धा.- लेखक (ॲङ बाळासाहेब बोडखे) मो.नं.9423471312

 

Post a Comment

0 Comments