पाथर्डी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी शिगेला

 

पाथर्डी - तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी अर्ज स्विकारण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत अकरा सरपंच पदासाठी ६४ तर १०९ सदस्य पदासाठी ४१४ अर्ज प्राप्त झाले आहेत.निवडणुक लढवणाऱ्या इच्छुकांनी २ डिसेंबर या अर्ज स्विकारण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी केली होती. तहसिल कार्यालयाला शुक्रवारी जत्रेचे स्वरुप प्राप्त झाल्याने पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने १८ नोव्हेंबर पासून प्रक्रिया सुरू केली होती. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरणे, ५ डिसेंबर रोजी छानणी, ७ डिसेंबरला अर्ज माघारी घेण्याचा दिवस असून त्याच दिवशी दुपारी ३ नंतर चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.त्यांनतर प्रचाराचा धुरळा उडवून १८ डिसेंबर रोजी मतदान आणि २० डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

मोहरी - सरपंच पदासाठी ३ व सदस्य पदासाठी ३२,वडगाव- सरपंच पदासाठी ४ व सदस्य पदासाठी ३६,सोनोशी-सरपंच पदासाठी ११ व सदस्य पदासाठी २५,कोळसांगवी- सरपंच पदासाठी ३ व सदस्य पदासाठी १७, निवडुंगे-सरपंच पदासाठी ७ व सदस्य पदासाठी ४१,भालगाव- सरपंच पदासाठी ८ व सदस्य पदासाठी ७९, वैजुबाभुळगाव- सरपंच पदासाठी ५ व सदस्य पदासाठी १४,कोरडगाव- सरपंच पदासाठी ४ व सदस्य पदासाठी ३६,कोल्हार- सरपंच पदासाठी ५ व सदस्य पदासाठी ३१ तिसगाव सरपंच पदासाठी ६ व सदस्य पदासाठी ७१, जिरेवाडी सरपंच पदासाठी ८ व सदस्य पदासाठी ३२ असे एकुण सरपंच पदाच्या ११ जागेसाठी ६४ उमेदवारी तर सदस्य पदासाठी एकुण १०९ जागेसाठी ४१४ अर्ज दाखल झाले.

तहसीलदार शाम वाडकर, नायब तहसिलदार,मुरलीधर बागुल,भानुदास गुंजाळ यांच्यासह निवडणुक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत कामकाज करीत होते. ऑफलाईन अर्ज स्विकारल्याने ते अर्ज आता ऑनलाईन करण्याची जबाबदारी प्रशासनावर पडली आहे. तालुक्यातील भालगाव, तिसगाव, कोरडगाव या गावातील ग्रामपंचायतच्या निवडणुकी सर्वाधिक चुरस दिसणार आहे.


Post a Comment

0 Comments