पाथर्डी
- शहर हद्दीतील दुकानातून प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक वापरल्या जात
असल्याच्या गोपनीय माहितीवरून प्रदूषण नियंत्रन मंडळ व पालिका पथकाच्या वतीने आज
दुपारी विशिष्ठ दुकानावर धाडी टाकून दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या
पिशव्या व बंदी असलेले प्लास्टिकचे साहित्य जप्त केल्याने चिडलेल्या व्यापारी
वर्गाने अचानक पालिका कार्यालयावर मोर्चा काढत पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब
विचारत तासभर धरणे आंदोलन केले.
राज्यात
शासनाने व न्यायालयाने वेळोवेळी घालून दिलेल्या मानांकनाप्रमाणे प्लास्टिक बंदी
केलेली असल्याचे कारण पुढे करत अहमदनगर प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाथर्डी
पालिकेच्या संयुक्त कारवाईत आज दुपारी सहा दुकानांवर धाडी टाकून दुकानांमधील
प्लास्टिक पिशव्या ग्लास पत्रवाळ्या आदींसह बंदी असलेले व इतरही प्लास्टिकचे
साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच
पालिकेच्या पथकाने व्यापाऱ्यांना प्लास्टिक बंदी बाबत यापूर्वी कुठलीही पूर्व
सूचना अगर नोटीस अगर जनजागृती न करता थेट बळजबरीने दुकानात प्रवेश करून
व्यापाऱ्यांना अरेरावी करून मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त केल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी दुपारी दोनच्या सुमारास
बाजारपेठेतील दुकाने अचानकपणे बंद करून पालिका कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी
व्यापाऱ्यांनी जमाव करून कार्यालयात उपस्थित असलेले कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक
दत्तात्रय ढवळे यांना सदरील कारवाई करताना भेदभाव केला जात असून सदरील कारवाई
कोणत्या पुढाऱ्याने करावयाला लावली तुम्हाला विशिष्ट लोकांचीच दुकाने दिसतात का ? अशा
प्रश्नांची सरबत्ती करत सदरील कारवाई चुकीची असल्याचा आक्षेप नोंदवला. दरम्यान या
पथकातील एका कर्मचाऱ्याकडून व्यापाऱ्यांनी कार्यवाहीसाठी केलेल्या यादीची प्रत
घेऊन ती उपस्थित व्यापाऱ्यांना दाखवली त्या प्रतीमध्ये ठराविक दुकानदारांची माहिती
लिहिलेली होती.
भेदभाव व चुकीची कार्यवाही होत असल्याचा आरोप करत अशी कारवाई मागे घेण्याच्या मागणी लावून धरत आंदोलन मागे घेण्यास व्यापारी तयार नव्हते त्यामुळे काही काळ पालिका कार्यालयात तणावाची वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संतप्त व्यापाऱ्यांनी स्वच्छता निरीक्षक यांना यापूर्वी धाडी टाकून जप्त केलेले प्लास्टिकचे साहित्य कुणाच्या ताब्यात आहे ? ते तुम्ही विकले का ? अथवा त्या साहित्याचे काय केले ? त्याचा खुलासा आम्हाला द्या असा जाब विचारला.
व्यापारी पालिके मध्ये पोहोचण्या अगोदर माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड हे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी
व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व अभय आव्हाड यांनी खासदार सुजय विखे व
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना फोन लावून पालिका व प्रदूषण विभागाच्या
अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये यासाठी गळ घातल्याने वरिष्ठ पातळीवर हालचाली
होवून पालिका व प्रदूषण मंडळाच्या पथकाचा प्लास्टिक विरोधी कारवाईचा सूर अचानकपणे
मावळलेला दिसला मात्र यावेळी उपस्थित असलेल्या एका व्यापाऱ्याने अभय आव्हाड व
रामनाथ बंग यांना भाजपचे सरकार असताना अशी कारवाई कशी होते असा प्रश्न विचारला असता
उपस्थित व्यापारी आंदोलकात मोठा हशा पिकला. यावेळी माजी नगरसेवक रामनाथ
बंग मुकुंद गर्जे,किशोर परदेशी, व्यापारी सुशील पटवा सचिन भंडारी सुभाष चोरडिया सतीश भंडारी अजय
भंडारी जानमल देसरडा यांच्यासह बहुसंख्य व्यापारी वर्ग तसेच पालिका कार्यालयीन अधीक्षक आयुब शेख,सोमनाथ गर्जे,स्वछता
निरीक्षक दत्ता ढवळे तसेच अहमदनगर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कक्ष अधीकारी रवींद्र
पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments