सेवा मंडळाच्या बुद्धिबळ स्पर्धेत इंगळे प्रथम

पाथर्डी - महाराष्ट्र सेवा मंडळ व आनंद चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत लहान गटात आयुष आया (तिसगाव ) खुल्या गटात आशिष चौधरी ( नगर) तर मुलींसाठी राखीव गटात नगरच्या वेदांती इंगळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

माहेश्वरी राम मंदिरात आयोजित या स्पर्धेत राज्याच्या विविध भागातून एकूण 180 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे यंदाचे 28 वे वर्ष असून या स्पर्धेत अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या एका स्पर्धकाने तर उस्मानाबादच्या एका वृद्धाने सहभाग घेतला. राज्यात सांगली नंतर पाथर्डी ची स्पर्धा सर्वात जुनी स्पर्धा म्हणून बुद्धिबळ प्रेमींकडुन ओळखली जाते. अमेरिकेचे नागरिकत्व असलेले व सध्या पुण्यात राहणाऱ्या शौर्य गालानी याने प्रथमच अशा स्पर्धेत भाग घेतला. शहरातील एका अंध व्यक्तीने सुद्धा सहभाग नोंदवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उस्मानाबाद, औरंगाबाद, पुणे, नगर, बुलढाणा, लातूर , सांगली, सातारा, बीड, नारायणगाव, फलटण आदी ठिकाणाहून लहान मोठ्या गटात स्पर्धक सहभागी झाले. नगरच्या बलभीम सांगळे यांनी सलग 26 वर्ष स्पर्धेत सहभाग नोंदवल्याने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा - लहान गट, प्रथम-आयुष आया तिसगाव, द्वितीय- श्रुती काळे औरंगाबाद, तृतीय -साक्षी चव्हाण औरंगाबाद, चतुर्थ- श्रीराज इंगळे नगर, पाचवा- श्रेयस नलावडे औरंगाबाद, सहावा क्रमांक- प्रसन्न जगदाळे बार्शीखुला गट- प्रथम क्रमांक- आशिष चौधरी नगर, द्वितीय क्रमांक -प्रज्वल आव्हाड पाथर्डी, तृतीय क्रमांक- प्रशांत सोमवंशी सातारा, चतुर्थ- मयुरी पाटील सातारा, पाचवा -चैतन्य पंधरकर नगर, सहावा- ओंकार पडव सातारा, मुलींकरता राखीव गटात वेदांती इंगळे नगर व वैभवी पाथरकर पाथर्डी यांनी क्रमांक मिळवला.

पारितोषिक वितरण समारंभ रविवारी सायंकाळी संपन्न झाला यावेळी डॉ विनय कुचेरिया, डॉ अभय आव्हाड, राम पाथरकर, डॉ शिरीष जोशी, माजी प्राचार्य महादेव फुंदे, संजय ससाने, भाऊसाहेब गोरे, श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे विश्वस्त सुरेश कुचेरिया यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी बोलताना डॉ विनय कुचेरिया म्हणाले, सलग 28 वर्ष राज्यस्तरीय स्पर्धा शहरात संपन्न होत असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग स्पर्धांमध्ये राहिला आहे. मानसिक ताण तणाव, मोबाईलचा अतिरेक, आदी साधनांमुळे नव्या पिढीचे विविध खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. मानसिक व भावनिक स्वास्थ्य व मेंदूची सकारत्मकता क्षमता विकसित होण्यासाठी बुद्धिबळा एवढा दुसरा कोणता खेळ नाही. स्पर्धात्मक युगात मानसिक व भावनिक वाढ खुंटत चालल्याने नैराश्य गुन्हेगारी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. मैदानी खेळ योग व निसर्गाच सानिध्याने परिस्थिती बदलणे शक्य आहे. बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय पातळीवर करण्याबाबत मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शिरीष जोशी, स्वागत राम पाथरकर, सूत्रसंचालन भाऊसाहेब गोरे तर आभार संजय ससाने यांनी मानले.


Post a Comment

0 Comments