आव्हाड महाविद्यालयात एनसीसी अमृतमहोत्सव साजरा


पाथर्डी –  येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात एनसीसी स्थापना दिवस व एनसीसीचा अमृतमहोत्सव प्लास्टिकमुक्त व स्वच्छता अभियान तसेच मार्गदर्शनपर व्याख्यानाने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालय परिसरात एनसीसी छात्रांनी श्रमदान करून परिसरातील प्लास्टीक पिशव्या, बाटल्या व इतर प्लास्टीकजन्य पदार्थ, कचरा गोळा केला तसेच अनावश्यक झाडेझुडपे तोडून त्याची विल्हेवाट लावली. 

अमृत महोत्सवांतर्गत निवृत्त एनएसजी कमांडो तसेच नव्याने एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत दारूबंदी शुल्क अधिकारीपदी निवड झालेले निलेश पालवे यांचे व्याख्यान एनसीसी छात्रांसाठी आयोजित करण्यात आले. यावेळी पालवे यांनी आर्मी भरती होण्यासाठी एनसीसी किती महत्वाची आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन छात्रांना केले. भारतीय आर्मी ही जगात सर्वश्रेष्ठ असून एखादे ऑपरेशन राबवताना अचुकतेचे प्रमाण ९९.९९% इतके असते. या आर्मीचा भाग होऊन देशसेवा करण्याची संधी एनसीसी छात्रांना मिळू शकते, फक्त त्यांनी प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध रीतीने एनसीसीच्या सर्व उपक्रमात भाग घेऊन आपले सर्वश्रेष्ठ योगदान देणे आवश्यक आहे असे ते शेवटी म्हणाले.  सर्व उपक्रम १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफीसर कर्नल चेतन गुरुबक्ष, पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ जी पी ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. उपक्रमाचे संयोजन एनसीसी प्रमुख कॅप्टन डॉ अजयकुमार पालवे तर आभार प्रा किरण गुलदगड यांनी मानले.

Post a Comment

0 Comments