येळी ग्रामपंचायतीला शासनाचा तालुकास्तरीय सुंदर ग्राम पुरस्कार

पाथर्डी – तालुक्यातील येळी ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा तालुकास्तरीय आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार मिळाला असून याबाबत जिल्हाभरातून येळी ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दहा लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून अहमदनगर जिल्ह्यातील संवत्सर ता.कोपरगाव व थेरगाव ता.कर्जत अश्या दोन ग्रामपंचायतीना जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक विभागून पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील वीरगाव,संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे,राहता तालुक्यातील बाभळेश्वर,श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक व उंदिरगाव यांना विभागून,राहुरी तालुक्यातील तांदुळनेर,नेवासे तालुक्यातील खुपटी,शेवगाव तालुक्यातील वडुले बु,जामखेड तालुक्यातील मोहरी,श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु,पारनेर तालुक्यातील मांडवे बु.,नगर तालुक्यातील कोळेवाडी या ग्रामपंचायतीना देखील तालुकास्तरीय सुंदर ग्राम पुरस्कार घोषित झाला आहे. 

ग्रामविकास विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतात. आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना म्हणून राबविली जाते. आर.आर पाटील यांनी राज्यात ग्रामस्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरु करुन त्या प्रभावीपणे राबविल्या. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे त्यांच्या स्मरणार्थ चांगले काम करणाऱ्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण दरवर्षी आर. आर. (आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरावर संबंधीत जिल्ह्यांचे पालकमंत्री किंवा जिल्ह्यातील मंत्री किंवा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते केले जाते.

 


Post a Comment

0 Comments