पाथर्डी पालिका हद्दीतील वृक्षांची कत्तल,प्रशासनाचे दुर्लक्ष !

 

पाथर्डी - शहरामध्ये पालिका व वन विभागाच्या दुर्लक्षाने सर्रास सार्वजनिक ठिकाणावरील वृक्षतोड सुरू असून,अतिक्रमण करणाऱ्यांची रस्त्याच्या बाजूकडील मोठी झाडे राजरोस तोडून टपरीसाठी जागा तयार करण्याचा धंदा सुरू केला आहे.याविरुद्ध कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक,बर्ड संस्थेचे डॉ.दीपक देशमुख व लायन्स क्लबचे राजेश काळे यांनी दिला आहे.

याबाबत माहिती देताना डॉ. देशमुख म्हणाले,विविध सामाजिक संस्थांनी गेल्या आठ ते दहा वर्षात शहराच्या विविध ठिकाणी व रस्त्याच्या दुतर्फा देशी विदेशी झाडे लावून त्यांचे संगोपन केले. पाथर्डी मढी रस्ता करण्यासाठी रस्त्याच्या हद्दीबाहेरील असलेली झाडे सुद्धा जेसीबी मशीन ने ठेकेदाराने तोडली.त्याचीही दखल पालिकेने घेतली नाही.वनदेव परिसरातही अधून मधून वृक्षतोड सुरू असते.वाजत गाजत करण्यात आलेले वृक्षारोपण उपक्रमातील झाडे पाण्याअभावी जळून गेली आहेत.शहरांमध्ये जागा मिळेल तेथे टपरी टाकली जाते.पण आता तर शहरातील काही जणांनी धामणगाव चौकातील रस्त्याच्या कडेचे कांचनारचे मोठे डेरेदार झाड मशीनच्या साह्याने तोडले.वन विभाग व पालिका कार्यालयापासून दोन मिनिटांच्या अंतरावरील मोठा वृक्ष तोडून त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया दोन दिवस चालू होती. संबंधित नागरिकांनी भल्या मोठया खोडाचे विल्हेवाट लावून धामणगाव रस्त्यावरील माळरानावर टाकून दिले आहे. त्याचा पंचनामा त्वरित होऊन पोलिसामार्फत तपास करून संबंधित यंत्रसामुग्री जप्त करावी व झाड तोडण्याचा आदेश कोणी दिला त्याचे विरुद्ध कारवाई व्हावी अन्यथा शहरातील सर्व पर्यावरण प्रेमी नागरिकांना पालिका कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा देशमुख यांनी दिला.दरम्यान जागा दिसेल तिथे अतिक्रमण करण्याची मोहीम सध्या शहर परिसरात सर्व महत्वाच्या भागात सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व संबंधित अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments