करंजी – (अशोक मोरे) पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील धार्मिक व सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे, अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले प्रगतशील शेतकरी व जुन्या काळातील प्रसिद्ध व्यापारी महादेव पाटीलबा कारखेले यांचे गेल्या वर्षी २५ फेब्रुवारी २०२२ रोजी दुःखद निधन झाले होते. मृत्यू समयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. उद्या मंगळवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध असल्याने या वर्षश्राद्ध निमित्ताने त्यांना त्रिभुवनवाडी व पंचक्रोशीतील मित्रमंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
पांढराशुभ्र शर्ट, धोतर, कडक टोपी, हातात बागायतदार पंचा, असा रुबाबदार पेहराव असलेले स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले आपल्या विशेष व्यक्तिमत्त्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असत. त्रिभुवनवाडी आणि पंचक्रोशीत ते "जिंदगी" या टोपण नावाने ओळखले जायचे. करंजी, देवराई, घाटशिरस, सातवड, कौडगाव, निंबोडी व तिसगाव परिसरात त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार आहे. स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५१ साली स्वर्गीय पाटीलबा बाबुराव कारखेले व स्वर्गीय रंगुबाई पाटीलबा कारखेले या शेतकरी कुटुंबात झाला होता.गरिबी परिस्थितीमुळे स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांना शालेय शिक्षण घेता आले नाही,मात्र व्यवहारिक ज्ञानाने,आपल्या असामान्य कर्तुत्वाने, असामान्य बुद्धिमत्तेने त्यांनी परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले हे जुन्या काळात कुठलेही तंत्रज्ञान नसताना विहीर खोदकामाचे ठेकेदार होते. पाथर्डी, शेवगाव व नेवासा तालुक्यात त्यांनी किमान २०० ते २५० विहिरींचे खोदकाम मजूरामार्फत करून घेतले. तसेच जुन्या काळात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांचा लाकूड व्यवसायही होता. त्यांच्याकडे नेहमी ४० ते ५० मजूर विहीर व लाकूड व्यवसायामध्ये काम करायचे.स्पष्टवक्तेपणा, निर्भीडपणा, निर्णय क्षमता हे गुण अंगी असल्यामुळे परिसरातील लोक त्यांच्याकडे न्याय निवाड्यासाठी येत असत. यावेळी अगदी काही वेळातच ते एखाद्या गोष्टीचा न्याय निवाडा करत असत.जुन्या काळात परिसरातील लोकांच्या कोर्टातील अनेक केस त्यांनी सामोपचाराने सोडवण्यासाठी यशस्वी मध्यस्थाची भूमिका बजावली होती. त्यामुळे न्यायालयातील अनेक प्रकरणे न्यायालयात जाण्यापूर्वी तसेच न्यायालयात गेलेली प्रकरणे सुद्धा निकाली निघाली होती.
स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांना परिसरातील लोक 'जिंदगी" या टोपण नावाने ओळखायचे."जिंदगी" या नावाचा अर्थही विशेष होता. जीवनात त्यांनी कधीही कुठलीही चिंता केली नाही. कशीही परिस्थिती समोर आली तरी ते त्या परिस्थितीला सामोरे जात असत व जीवनाचा आनंद घेत असत. संसार, प्रॉपर्टी, इस्टेट याचा त्यांनी आयुष्यात कधीही विचार केला नाही. मित्रपरिवार, कुटुंब हीच आयुष्यातील खरी प्रॉपर्टी आहे असे ते समजायचे.स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांना त्यांच्या जीवनात व त्यांच्या कार्यात त्यांची पत्नी श्रीमती शांताबाई महादेव कारखेले. यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आपले पती स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्या पत्नी श्रीमती शांताबाई महादेव कारखेले मोलाची साथ देत असत.
वडील स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांच्या स्वभावाचा व कार्याचा फार मोठा प्रभाव त्यांचा मोठा मुलगा विजय कारखेले यांच्यावर पडला. विजय कारखेले यांनी १७ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकाची नोकरी स्वीकारून सुद्धा खूप मोठे सामाजिक कार्य उभे केले. तेथील गरंजी गावात स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतर पहिल्यांदाच वीज आणत आदिवासींच्या जीवनात 'प्रकाश' पोहोचवला. तसेच विविध योजना आदिवासी बांधवांच्या घरोघरी पोहोचवून आदिवासी बांधवांचे जीवन सुजलाम, सुफलाम केले हे मी स्वतः अनुभवलेले आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात बदली झाल्यानंतर सुद्धा मुळशी तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले व विविध योजनांचा लाभ मिळवून देत शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचे कार्य केले. विविध वृत्तवाहिन्या व विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून आदर्श शिक्षक विजय कारखेले यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून कारखेले हे नाव व स्वर्गीय महादेव पाटील व कारखेले यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलेले आहे. माझ्या वडिलांच्या विचारधारेचा प्रभाव माझ्यावर पडल्यामुळेच मी हे सामाजिक कार्य करू शकलो असे विजय कारखेले यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या संकट काळात आदर्श शिक्षक विजय कारखेले यांनी लॉकडाऊन च्या काळात कामधंदे बंद पडलेल्या कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी दत्तक घेतल्यानंतर विजय कारखेले यांच्याबरोबर त्यांचे वडील स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांनी महत्त्वाची व मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांनी स्वतः गोरगरीब कुटुंबाच्या घरी जाऊन अन्नधान्य वाटप केले.स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांचे दुसरे चिरंजीव दिपक महादेव कारखेले हे भारतीय लष्करात असून सध्या ते पंजाब या ठिकाणी लष्करात आपली सेवा देत आहेत. देशसेवेचे हे व्रत आपल्या वडिलांच्या संस्कारामुळेच आपण स्वीकारले असल्याचे दिपक कारखेले यांनी सांगितले. स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांना दोन मुली असून मोठी मुलगी शैला रमेश पालवे व लहान मुलगी सविता उमेश पालवे या विवाहित असून सुखी परिवारामध्ये आहेत.
वडिल स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचाराचे कार्य सातत्याने सुरू ठेवण्यासाठी व त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा जोपासण्यासाठी त्यांचे चिरंजीव आदर्श शिक्षक विजय कारखेले व त्यांच्या परिवाराने "जिंदगी फाउंडेशन" या नोंदणीकृत सामाजिक संस्थेची स्थापना केली असून या सामाजिक संस्थेमार्फत विविध उपक्रम सध्या राज्यभर सुरू आहेत. लवकरच "जिंदगी वृद्धाश्रम व अनाथ आश्रम" त्रिभुवनवाडी येथे सुरू होणार असून येत्या अक्षयतृतीया या उपक्रमाची पायाभरणी होणार असल्याचे विजय कारखेले यांनी सांगितले. या वृद्धाश्रमामुळे व अनाथाश्रमामुळे त्रिभुवनवाडी आणि पंचक्रोशीतील लोकांना अनाथ व निराधार लोकांची सेवा करण्याची फार मोठी संधी मिळणार आहे.
एक सच्चा व प्रामाणिक मित्र, आनंदी व्यक्तिमत्व, आनंदयात्री, आनंदाचे डोही आनंद तरंग या म्हणीप्रमाणे जरी स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले आपल्यात नसले तरी जीवनात आनंदी कसं जगावं हे त्यांनी दाखवून दिलं. जीवनातील आनंद यात्री गमावल्याची खंत परिसरातील नागरिकांतून दिसून येत आहे. उद्या १४ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, समाज प्रबोधनकार ह. भ. प. चंद्रकांत महाराज खळेकर यांची कीर्तन सेवा स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांच्या निवासस्थानी त्रिभुवनवाडी फाटा, तालुका पाथर्डी येथे होणार आहे. प्रथम वर्षश्राद्ध निमित्ताने स्वर्गीय महादेव पाटीलबा कारखेले यांना पंचक्रोशीच्या वतीने व सर्व मित्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments