शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम, विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांचा पुढाकार !


पाथर्डी  - सहल म्हटले की मस्ती, धमाल, गाणे- गोष्टी, पर्यटनाचा आनंद लुटणे हे ठरलेले असते या सर्व बाबींबरोबरच पाथर्डी येथील श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला असून ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य पर्यटनाबरोबर शिवनेरी किल्ला परिसरात कचरा गोळा करून ऐतिहासिक व शिवजन्म स्थळाचे पावित्र्य जपण्याचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पर्यटकांना विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून पावित्र्य व स्वच्छता राखण्याचा संदेश दिला.

हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत पावन झालेल्या या ऐतिहासिक भूमीवर सर्व विद्यार्थी व शिक्षक नतमस्तक झाले. विद्यार्थी व शिक्षकांनी परिसरात पडलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थाच्या प्लास्टिक पिशव्या, कागदाचे तुकडे असा कचरा गोळा केला. रिकाम्या गोण्या भरून किल्ल्याच्या पायथ्याशी आणून कचऱ्याची विल्हेवाट लावली त्यामुळे विद्यालयाची सहल ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनाबरोबरच स्वच्छता व ऐतिहासिक वारसाचे पावित्र जपणारी ठरली तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करणारी व इतर पर्यटकांना स्वच्छता संदेश देणारी प्रेरणादायी ठरली.

पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी या शाळेची शैक्षणिक सहल पाच टप्प्यात १९ बस मधून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी नेण्यात आली. यात मोरगाव, जेजुरी, महाबळेश्वर, प्रतापगड, कोल्हापूर परिसर, भीमाशंकर, शिवनेरी, लेण्याद्री, ओझर, संभाजीनगर परिसर, ज्योतिबा व पन्हाळा अशा ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य ठिकाणी आयोजित करून विद्यार्थ्यांना विविध अनुभूती देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबर शैक्षणिक सहलीचे आयोजन केले.

पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड व मुख्याध्यापक शरद मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक यांच्या सहकार्याने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. यासाठी पाथर्डी आगार व्यवस्थापक आरिफ पटेल व महेश कासार तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी (चालक) सहकार्य केले.

 

  

Post a Comment

0 Comments