काश्मिरात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे !


पाथर्डी - पाथर्डी तालुक्याचे जावई व पुणे जिल्ह्याचे भुमीपुत्र तथा काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांच्या पुढाकाराने भारत-पाकिस्तान सीमेवर टिटवाल खोऱ्यात दोन विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्यात येणार असून छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यावरील माती व पाणी या भुमीपुजनासाठी नेण्यात येणार आहे. 

आम्ही पुणेकर नावाची पुण्याची संस्था या कार्यात सहभागी राहणार आहे. समस्त महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या छत्रपतींच्या युद्धनीती व पराक्रमाची माहिती शेजारी राष्ट्राला कळून आपल्या भारतीय सैनिकांनाही सतत प्रेरणा मिळत राहावी असा प्रमुख उद्देश पुतळा उभारण्यामागे असून नव्या पिढीला देशाचा स्वाभिमान व शौर्याचा इतिहास कळावा म्हणून जाणीवपूर्वक असा निर्णय समितीने घेतला. आजच्या काश्मीर खोऱ्यापेक्षाही अत्यंत कठीण व त्याकाळी साधनसामुग्री नसताना श्रेष्ठ युद्ध कौशल्य व जबरदस्त आत्मविश्वास मनात बाळगून छत्रपतींनी किल्ले जिंकले. स्वराज्य संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या किल्ल्यांची निर्मिती केली. कश्मीर खोऱ्यात छत्रपतींचा पुतळा स्थापन करण्याचे मोठे शिव धनुष्य पेलण्याचा संकल्प पुणेकर संस्था, शिवप्रेमी नागरिक व जिल्हाधिकारी डॉ. डोईफोडे यांनी केला असून मराठी माणूस प्रशासनाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा व प्रेरणास्थान निर्मितीसाठी पुढाकार घेतोय याचा राज्यातील प्रत्येकाला अभिमान वाटायला हवा. अशी माहिती त्यांचे निकटवर्ती ओमप्रकाश दहिफळे यांनी दिली.

शत्रूशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, युद्धनीती, गनिमीकावा, आत्मविस्वास आणि नैतिक मूल्य त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत महाराजांचे शौर्य स्मरून शत्रू सोबत लढण्याचे बळ मिळावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरच्या किरण व तकधर खोऱ्यात दोन ठिकाणी प्रत्यक्ष नियंत्रण रेषे जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी  स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड तसेच शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तोरणा, राजगड, शिवनेरी, प्रतापगड आदी गडकिल्ल्यांच्या परिसरातील माती या स्मारकाच्या उभारणीमध्ये वापरण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments