महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची हाक

पाथर्डी - मागील चार वर्षापासून शासन स्तरावरील प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयातील सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने 20 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 
प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यातील आंदोलनास दिनांक 2 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून परीक्षा कामकाजावरील बहिष्कारच्या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन तीस ते तीन या वेळेत अवकाश काळात निदर्शने, दिनांक 15 फेब्रुवारी रोजी काळया फिती लावून कार्यालयीन कामे करणे, दिनांक 16 फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप असून त्यानंतरही शासनाने विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची दखल न घेतल्यास दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पासून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयाचे कामकाज बेमुदत बंद राहील अशी माहिती महाविद्यालयीन महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष वैभव रोडी व सचिव् संतोष कानडे यांनी दिली. 
सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन आदेश पुनर्जीवित करून सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे,सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10 :20 :30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतरांना लागू करणे , सातव्या वेतन आयोगापासून वंचित राहिलेल्या राज्यातील एकूण 1410 विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू करणे तसेच सातव्या वेतन आयोगाच्या एकूण 58 महिन्यांची थकबाकी अदा करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्यावी,2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे , अशा स्वरूपाच्या मागण्या शासन दरबारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून मंत्रालय स्तरावरअनेक वेळा निवेदन ,चर्चा, चर्चा होऊनही शासनाच्या उदासीन धोरणामुळे आजपर्यंत काहीही कार्यवाही न झाल्याने विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून शासनाच्या पक्षपाती व अन्यायकारक भूमिकेमुळे शासनाच्या विरोधात महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आंदोलनाची भूमिका घेणे भाग पडत असल्याचे सेवक संयुक्त कृती समितीच्या निवेदनात म्हटले आहे . 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होत असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा दिनांक 20 फेब्रुवारीपासून बे मुदत संपामुळे वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वेळीच शासन स्तरावर हालचाल न झाल्यास सदरच्या परीक्षांच्या प्रशासकीय कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

Post a Comment

0 Comments