करंजी - राज्याच्या
विधानसभेचे अधिवेशन सध्या सुरू असून अनेक आमदार, मंत्री यांनी
जनतेच्या प्रश्नावर चर्चा करणे अपेक्षित आहे, विरोधी पक्षांच्या आमदारांनी जनतेचे
प्रश्न पोटतिडकीने मांडावेत व सत्ताधारी पक्ष्याच्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी तितक्याच गांभीर्याने व जबाबदारीने त्या प्रश्नांची
उत्तरे द्यावीत, ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची अपेक्षा
असताना सभागृहात काही मंडळी हास्य विनोद करीत आहेत,एकमेकांच्या
वैयक्तिक आयुष्यावर,घटनेवर बोलत आहेत, हे
अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत बहुजन क्रांती पक्षाचे अध्यक्ष ऍड सतीश पालवे यांनी
व्यक्त केली आहे.
राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या पैशातून सभागृह चालते, दररोज लाखो रुपये खर्च सभागृह चालवण्यासाठी खर्च होत असतो, त्यामुळे एक मिनिट सुद्धा सभागृहात महत्त्वाचा असतो. पण याचे गांभीर्य आज कोणत्याच पक्षाला राहिलेले नाही. आज राज्यात शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतमालाला भाव नाही, त्याला शेतमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे, फळबागा शेतकरी उपटून फेकत आहे कारण वाढते खर्च परवडणारे नाहीत. आपल्यासाठी भांडणारी, लढणारी लोकं आता शिल्लक राहिली नाहीत म्हणून शेतकरी हवालदिल झाला आहे, हतबल झाला आहे, निराश झाला आहे व त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत.
विद्यार्थी,बेरोजगार,कामगार,उद्योगधंदे,छोटे व्यावसायिक, नोकरदारवर्ग यांचे प्रश्न गंभीर रूप
घेत असताना सभागृहात हास्य विनोद सुरू आहेत.यांचं सभागृहाचं कामकाज आणि झी मराठी
वरील हास्यजत्रा कार्यक्रम सारखाच वाटतोय. यांना गांभीर्याने कामकाज करायचे नसेल
तर सभागृहाचे कामकाज बंद केले पाहिजे असं मत ऍड सतीश पालवे यांनी व्यक्त केलं आहे.
0 Comments