जीरेवाडीतील गोठ्यात ६ लाखांची बनावट दारू जप्त

 

पाथर्डी – तालुक्यातील जीरेवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे यांच्या पथकाने बनावट देशी दारु निर्मीतीच्या कारखान्यावर धाड घालून ५ लाख ८२ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल बनावट देशी दारुचा साठा जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे या पथकाने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने दिनांक १९/०६/२०२३ रोजी सुखदेव ज्ञानदेव आंधळे यांचे शेतामधील राहत्या घराच्या पाठीमागे, पत्रा शेडमध्ये, जिरेवाडी गावचे हददीत, संत वामन भाऊ विद्यालयाचे पुर्वेस, भगवान गडाच्या उजव्या बाजूस, जिरेवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर या ठिकाणी छापा मारुन स्पिरीटने भरलेले ३५ लिटर क्षमतेचे २ प्लास्टीक कॅन, तयार देशी दारुच्या ब्लेंन्डने भरलेले ३५ लिटर क्षमतेचे ५ प्लास्टीक कॅन, देशी दारु बॉबी संत्राच्या ९० मिली क्षमतेच्या १५०० सिलबंद बाटल्या, देशी दारुची बनावट झाकणे व लेबल, बुचे सिल करण्याचे सिलींग मशीन, मद्याच्या रिकाम्या बाटल्या तसेच बनावट देशी दारु तयार करण्यासाठी लागणारे इतर साहीत्य व बनावट देशी दारुची वाहतुक व विक्री करणेकामी वापरलेला एक टाटा कंपनीचा ४०७ मॉडेलचा चारचाकी टॅम्पो क्र. MH १५/ G २२३२ त्यामध्ये देशी दारु बॉबी संत्राचे ९० मिली क्षमतेच्या ४०० सिलबंद बाटल्या (४ बॉक्स) व ९० मिली क्षमतेच्या अंदाजे १००० रिकाम्या बाटल्या ( १० बॉक्स) बाटल्या असा एकुण अं.कि.रु.५,८२,३२५/- इतक्या किंमतीचा दारुबंदी गुन्हयाचा मुददेमाल आढळून आला.

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे तरतुदी नुसार सदर ठिकाणी अवैधरित्या बनावट देशी दारु तयार करीताना मिळून आलेले इसम सतिश नवनाथ डमाळे वय ३८ वर्षे रा.बोंदरवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर, २) नितीन रामनाथ डमाळे वय ३० वर्षे रा. बोंदरवाडी ता.पाथर्डी जि. अहमदनगर ३) सुखदेव ज्ञानदेव आंधळे वय ५५ वर्षे रा.जिरेवाडी ता. पाथर्डी, जि. अहमदनगर, ४) अरुण विठठ्ल कराड वय ३२ वर्षे रा. येळी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर व ५) संजय विठठ्ल कराड वय २८ वर्षे रा. येळी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर यांना सदर गुन्हयामध्ये आरोपी क्र. १ ते ५ म्हणून जागीच अटक करण्यात आले. सदर कारवाईमध्ये निरीक्षक नंदकुमार शा.जाधव, दुय्यम निरीक्षक श्री.ए.सी. फडतरे जवान स्टाफ सर्व प्रताप कदम, एस.एस.पौधे, अमर कांबळे, अहमद शेख, अमोल दळवी यांनी सहभाग घेतला आहे.


Post a Comment

0 Comments