राजेंद्र जैन / कडा
-----------------
वैष्णवी लवाजम्यासह हरिनामाचा जयघोष करीत टाळ, मृदुंगाच्या गजरात पंढरीच्या विठुरायाच्या भेटीला निघालेल्या संतश्रेष्ठ प.पु. वै. हभप. मदन महाराज बिहाणी यांच्या पायी दिंडीचे मठाधिपती हभप. बबन महाराज बहिरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवांचा मेळा टाळ-वीणा चिपळ्या अन् भगव्या पताका घेऊन ज्ञानोबा माऊलीचा जयजयकार करीत कडा येथून सोमवारी पंढरीकडे मार्गस्थ झाला. बा.. विठूबा पाऊस पडू दे... रान शिवार फुलू दे..! असे विठुरायाला साकडे घालणार असल्याचे बबन महाराज यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यातील कडा येथील संत नगरीतील ग्रामदैवत तथा श्रद्धास्थान परमपूज्य संत श्री मदन महाराजांच्या कृपाशीर्वादाने या संस्थानचे मठाधिपती ह भ प बबन महाराज बहिरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे येथील संत नगरीतून कडा ते पंढरपूर पायी दिंडीचे भव्य आयोजन केले होते. सोमवार दि.१९ जून रोजी सकाळी शेकडो वैष्णवांचा मेळा हरिनामाचा जयघोष करीत टाळ - मृदुंगाच्या गजरात पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या भेटीला खांद्यावर भगव्या पताका घेऊन भक्तिमय वातावरणात निघाला. ह भ प संतश्री मदन महाराज यांच्या दिंडीच्या स्वागतासाठी कड्यात ठिकठिकाणी रस्त्यावर सुवासिनींनी रांगोळी घालून पंचारती ओवाळून चौकाचौकात भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रतिनिधीशी बोलताना बबन महाराज म्हणाले बा... विठूबा पाऊस पडू दे... रान शिवार फुलू दे ..! असे साकडे विठुरायाला घालणार असल्याचे सांगितले. या पायी दिंडी सोहळ्यात आष्टी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्षेत्रातील भाविक-भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रमजानभाईंकडून वारक-यांची अशीही सेवा...
------------------
मनात निर्मळ भाव असेल तर माणसातही देव दिसतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे रमजानभाई तांबोळी, मागील पंधरा वर्षापासून प.पु. संत श्री. मदन महाराजांच्या दिंडीत सहभागी होऊन टाळ, मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत विठूरायाच्या भेटीला निघालेल्या वारक-यांना दरवर्षी श्रध्देने पंगत देऊन वारक-यांची सेवा हिच पांडूरंगाची सेवा असल्याचे सांगून सामाजिक एकतेचा संदेश देत आहेत.
---------%%------
0 Comments